विजेचा खांब बदलून देण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारताना महावितरण कंपनीचा कार्यकारी अभियंता गुरुवारी (१९ मे) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला. त्याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेमचंद्र हरी नारखेडे (वय ५७) असे गुन्हा दाखल झालेल्या कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका ३८ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
नारखेडे याच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तक्रारदार हे ठेकेदार आहेत. त्यांनी मंचर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडे विजेचा खांब बदलून मिळण्यासाठी अर्ज केला होता. संबंधित अर्ज कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे याच्याकडे गेला होता. मात्र, नारखेडे याने या कामासाठी तक्रारदाराकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर तीन हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत १२ मे रोजी लाचलुचपच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर गुरुवारी मंचर येथील कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यात तक्रारदाराकडून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना नारखेडे याला ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजेंद्र बनसोडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Msedcl official caught accepting bribe bribe replacing power pole pune print amy
First published on: 19-05-2022 at 21:13 IST