वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा तोडण्याची कार्यवाही करण्यात आलेल्या शाळा आता पुन्हा प्रकाशमान होणार आहेत. राज्याच्या शालेय विभागाने वीजबिलांची थकबाकी भरल्याने महावितरणकडून शाळांचा वीजपुरवठा पुन्हा जोडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील २७७ शाळांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.

वीजबिलांची थकबाकी प्रचंड वाढल्याने जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात खंडित करण्यात आला होता. या कारवाईनंतर राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या शाळांच्या थकीत वीजबिलापोटी १४ कोटी १८ लाख रुपये जमा करण्यात आले. त्यामुळे संबंधित शाळांचा वीजपुरठा तत्काळ जोडण्याचे निर्देश महावितरणकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले होते. त्यानुसार वीजपुरवठा पूर्ववत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.

महावितरणच्या पुणे परिमंडलाच्या अंतर्गत मुळशी विभागातील ९०, मंचरमधील ८६ आणि राजगुरूनगर विभागातील जिल्हा परिषदेच्या १०१ आणि पुणे जिल्ह्यातील एकूण २७७ शाळांचा वीजपुरठा वीजबिल थकबाकीमुळे तात्पुरता तोडण्यात आला होता. वीजबिलांची रक्कम जमा झाल्याने वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या आदेशानुसार शनिवारी संध्याकाळी पाचपर्यंत सर्व शाळांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.