पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळण्यासाठी बोरघाटात मदत केंद्र सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या (एचएसपी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर ३ फेब्रुवारी रोजी ‘प्राॅपलीन’ हा रासायनिक वायू घेऊन जाणारा टँकर उलटून सुमारे ३२ तासांपेक्षा जास्त काळासाठी महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. आपत्कालीन यंत्रणेला घटनास्थळी पोहचण्यास वाहतूककोंडीमुळे विलंब लागला. प्रशासकीय व्यवस्थापनातील अभाव समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना ‘एमएसआरडीसी’ आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणेला दिल्या. त्यानुसार ‘एमएसआरडीसी’ आणि महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या बैठकीत बोरघाट येथे कायमस्वरूपी मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
बोरघाट परिसर हा खंडाळा ते खोपोलीदरम्यान सुमारे १८ ते २० किलोमीटर लांबीचा आहे. आपत्कालीन परिस्थितीत या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतो. या मदत केंद्रात अवजड वाहने स्थलांतरित करण्यासाठी ‘क्रेन’, अग्निप्रतिबंधात्मक यंत्रणा, रुग्णवाहिका, गस्तीसाठी वाहने, पाण्याचा टँकर, प्रकाश यंत्रणा, गॅस हाताळणी साधने, प्रतिसाद विभाग, कुशल मनुष्यबळ उपलब्ध असणार आहे. भौगोलिकदृष्ट्या पुणे-मुंबईच्या महामार्गावर मध्यवर्ती ठिकाण म्हणून बोरघाट परिसराची निवड करण्यात आली आहे. घाट रस्ता, बोगदा आणि वळणे यामुळे अवजड वाहनांचा बऱ्याचदा या ठिकाणावरच अपघात होतो.
हा भाग संवेदनशील असून अपघात काळात किंवा संकट समयी परिस्थितीनुसार तातडीने घटनास्थळी पोहचता यावे, अपघाताचे जलद निवारण करून वाहतूक सुरळीत सुरू रहावे, दीर्घकाळ अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रामुख्याने हे केंद्र तात्पुरते नसून कायमस्वरुपी राहणार असून आपत्कालीन परिस्थिती सुरक्षित आणि जलद हाताळून नागरिकांना सुलभ प्रवास उपलब्ध करून देणे हे मुख्य उद्देश ठेवण्यात आले असून बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लवकरच जागेबाबत निर्णय घेऊन पुढील बैठकीत कार्यवाही करण्यात येणार आहे, असे एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट करण्यात आले.
‘बोरघाट परिसरात सातत्याने अपघात घडत असतात. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने घटनास्थळी मदत मिळण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे,’ असे महामार्ग वाहतूक विभागाचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी सांगितले.
बोरघाट येथील मदत केंद्रामुळे तातडीने प्रतिसाद मिळू शकेल. तसेच वाहतूककोंडी टाळणे शक्य होणार आहे. – तानाजी चिखले, पोलीस अधीक्षक, महामार्ग वाहतूक विभाग

