पुणे : सुरक्षा रक्षक विभागातील भरती प्रक्रियेवर निर्बंध असल्याने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बस स्थानकांमध्ये महिला प्रवाशांच्या सुऱक्षिततेसाठी महिला सुरक्षा रक्षकांची कमतरता असल्याची कबुली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यानी दिली. मात्र, राज्यातील मुंबई मध्य, परळ, कुर्ला, स्वारगेट, शिवाजीनगर यांसह प्रमुख ४८ बस स्थानकांवर प्रत्येकी दोन अशा ९६ महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात आले असून उर्वरीत सुरक्षा रक्षकांसाठी जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ आणि मेस्को या संस्थांकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वारगेट बस स्थानकातील महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर राज्यातील बस स्थानकांवरील महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. बस स्थानकावर महिलांची छेडछाड, चोरी, मंगळसूत्र हिसकावून नेणे, पैसे चोरणे अशा घटना आणि तक्रारींचे निराकरण अद्याप होत असल्याने विधिमंडळातील सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर सरनाईक यांनी स्पष्टीकरण देताना ही कबुली दिली.

गेल्या फेब्रुवारी २०२५ मध्येच तातडीने गर्दीच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकांमध्ये तातडीने महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यातील प्रमुख बस स्थानकांवर मिळून एकूण ३९४ महिला सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार होती. मात्र, सुरक्षा विभागाकडे असलेली मनुष्यबळाची कमतरता आणि भरती प्रक्रिया रखडल्याने ९६ महिला सुरक्षा रक्षकांचीच नेमणूक करण्यात आली आहे, असे सरनाईक यांनी नमूद केले आहे.

तसेच जानेवारी ते सप्टेंबर २०२५ या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुरक्षिततेसंदर्भातील घडलेल्या ७०६ घटनांबाबतचा आढावा सरनाईक यांनी दिला. त्यापैकी ३० प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असून कालावधीत प्रवाशांची सामान-पैसे चोरी, छेडछाड, मंगळसुत्र हिसकावणे, लहान मुलांच्या सुरक्षिततेसंदर्भात १८२ प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तींना स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

वारंवार मागणी करुनही प्रतिसाद नाही

ज्या जिल्ह्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक कमी आहेत किंवा नेमणूक झालेली नाही, त्या ठिकणच्या जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे आणि मेस्को संस्थेकडे वारंवार मागणी करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून मनुष्यबळ पुरवले जात नसल्याची खंत व्यक्त करत वस्तूस्थितीही निदर्शनास आणून दिली.

राज्यातील एसटी महामंडळाच्या सर्व स्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विशेषतः महिला आणि लहान मुलांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही आणि स्थानिक पोलीस तैनात करण्यात आले आहे. महिला सुरक्षा रक्षकांमध्ये लवकरच वाढ करण्यात येणार असून नागरिकांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही केली जात आहे. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री