पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसथांब्यांवर तृतीयपंथीय व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर या सहा प्रादेशिक विभागांतील विविध बसस्थानकांवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी ९ कोटी ७६ लाख ६३ हजार १९५ रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेल्या निर्देशांनुसार परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे. एसटी बसथांब्यांवर तृतीयपंथी व्यक्तींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था नसते. त्यामुळे त्यांना अनेक सामाजिक आणि शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागते. प्रवासादरम्यान त्यांची कुचंबणा होते. याबाबत राज्यमंत्री मिसाळ यांनी एसटी महामंडळाला बसथांब्यांवर स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार एसटी महामंडळाने विविध बसस्थानकांवर स्वच्छतागृहे उभारण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला. त्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मिसाळ यांनी दिले होते.

दरम्यान, स्वच्छतागृहांच्या बांधकामासाठी लागणारा खर्च सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी उपलब्ध असलेल्या निधीतून करण्यात येणार आहे. बांधकाम सुरू करण्यापूर्वी आवश्यक नकाशांना मंजुरी घेणे, सविस्तर अंदाजपत्रक तयार करणे आणि संबंधित कार्यकारी अभियंत्यांची तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. स्वतंत्र स्वच्छतागृहांमुळे तृतीयपंथीय व्यक्तींना एसटीच्या थांब्यांवर अधिक सन्मानाने आणि सुरक्षितपणे प्रवास करता येणार असून, सार्वजनिक सुविधांमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.

तृतीयपंथीय व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी सन्मानाने वावरता आले पाहिजे. एसटीच्या थांब्यांवर स्वतंत्र स्वच्छतागृहे नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. संबंधित प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून, या सुविधांची कामे मार्गी लावली जातील. – माधुरी मिसाळ, राज्यमंत्री, परिवहन