पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाला ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत वर्षभरात ५४ कोटी ७१ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळाले आहे. पुण्यासह, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातून एक जानेवारी ते ३१ डिसेंबरपर्यंत राज्यभरात ७३ लाख ७२ हजारांहून अधिक ज्येष्ठांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचे पुणे एसटी विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकारने २०२२ मध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ७५ वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवास योजनेचा लाभ दिला जात आहे. ही सलवत मिळविण्यासाठी लाभधारकाला ५८५ रुपयांमध्ये ‘स्मार्ट कार्ड’ दिले जात असून, राज्यभर कोठेही विनाशुल्क प्रवास करता येतो. पुणे विभागांतर्गत या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरातील आकडेवारीनुसार सर्वाधिक सात लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनिमित्त प्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या योजनेतून पुणे एसटी विभागाला ५४ कोटी ७१ लाख ८५ हजार ४६१ रूपये उत्पन्न मिळाले असून, संबंधित रक्कम राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला वितरीत केली जाते. प्रत्येक तीन महिन्यांच्या टप्प्यांनुसार संबंधित रक्कम एसटी महामंडळाला वितरीत केली जात असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांनी एसटीने प्रवास करून पुणे एसटी विभागाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. जास्तीत जास्त ज्येष्ठांनी या योजनेचा लाभ घ्यावा. – अरुण सिया, विभाग नियंत्रक, पुणे
२०२५ मधील लाभार्थी आणि मिळालेले उत्पन्न
| महिना | लाभार्थी | उत्पन्न |
| जानेवारी | ५,६५,९०६ | ३,८६,२२,१७३ |
| फेब्रुवारी | ५,३६,९१४ | ३,९०,५८,०१६ |
| मार्च | ५,९५,३८७ | ४,२४,०६,३७२ |
| एप्रिल | ६,०५,६५७ | ४,३४,९९,८७० |
| मे | ६,०६,३६७ | ४,५७,१५,०४८ |
| जून | ६,०८,८४१ | ४,८०,७३,६३२ |
| जुलै | ६,०६,०३८ | ४,८५,८५,०२२ |
| ऑगस्ट | ६,४६,७७२ | ४,७०,२२,५५९ |
| सप्टेंबर | ५,९३,३९८ | ४,१३,९६,१७७ |
| ऑक्टोबर | ६,२८,९९५ | ४,५०,८८,०१३ |
| नोव्हेंबर | ७,००७३९ | ५,८५,०२,८६५ |
| डिसेंबर | ६,६७,२५३ | ४,९२,१५,७१४ |
| एकूण | ७३,७२,३६७ | ५४,७१,८५,४६१ |

