पुणे : ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) चालक आणि वाहकांना अतितातडी, कौटुंबिक अथवा आरोग्यासंबंधी प्रश्न उद्भवल्यास रजा मंजूर करावी, गैरहजेरी दाखवू नये,’ असे आदेश एसटी महामंडळाने नुकतेच परिपत्रकाद्वारे दिले आहे. त्यामुळे चालक, वाहकांना दिलासा मिळाला आहे.

चालक, वाहक आणि इतर कर्मचारी कामावर असताना अचानक आजारी पडले, घरगुती अडचण आली, तर रजा घेऊ शकतील, अशी मुभा देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कर्मचाऱ्याने पर्यवेक्षकांना लेखी कल्पना देऊन कळविणे आवश्यक आहे. मात्र, सध्या पर्यवेक्षकांना कल्पना देऊनही गैरहजेरीची नोंद केली जाते. याचा परिणाम एसटी सेवेवर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो. या प्रकारे अनेक कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यात आली असून, वर्तणुकीबाबत चुकीचे शेरे दिले गेले असल्याचा आरोप आहे. यामुळे वार्षिक पदोन्नती किंवा कार्यालयीन अहवालात कामाची नोंद चुकीची नोंद होत असल्याची तक्रार कर्मचारी आणि संघटनांनी एसटी महामंडळाकडे केली होती.

या तक्रारींची दखल घेऊन एसटी महामंडळाचे वाहतूक व्यवस्थापक सी. हसबनीस यांनी परिपत्रक काढून पर्यवेक्षकांना रजेसंबंधी सूचना दिल्या आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांकडून तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित पर्यवेक्षकावर कार्यवाही करण्यात येईल, असा इशाराही पत्रकाद्वारे दिला आहे. अर्थात, त्याच वेळी इतर तातडीच्या कारणास्तव चालक, वाहकांनी रजा घेतल्यास त्याची तपासणी करण्याचेही सूचित करण्यात आले असून, याची जबाबदारी त्या ठिकाणच्या आगार पर्यवेक्षकांवर निश्चित करण्यात आली आहे.

अतितातडी, कौटुंबिक किंवा आरोग्य-संबंधित कारणांसाठी रजा घेता येणार.
कामावर असताना अचानक आजारी पडणे, घरगुती अडचण आल्यास रजा मंजूर होईल आणि गैरहजेरी दाखवली जाणार नाही.
संबंधित कर्मचाऱ्याने पर्यवेक्षकांना लेखी कल्पना देऊन कळवणे आवश्यक.
पूर्वी लेखी सूचना देऊनही गैरहजेरी नोंद होत असे, आता तसे होणार नाही.
हे नियम चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी लागू आहेत.

कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारी कपात थांबेल.
नकारात्मक शेरा आणि पदोन्नतीतील अडथळे कमी होतील.
सेवा गुणवत्ता राखताना कर्मचाऱ्यांना वैयक्तिक अडचणींमध्ये लवचिकता मिळेल.
एसटी सेवेवर होणारा परिणाम कमी होईल, कारण कर्मचारी मानसिक दबावाखाली काम करणार नाहीत.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असून वेतन कपातीमुळे वेळोवेळी येणाऱ्या अडचणी, अर्ज, निवेदन देऊन वारंवार कार्यालयात जावे लागत होते. या निर्णयामुळे दबावाखाली काम करणारे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गैरफायदाही घेतला जाऊ नये म्हणून याबाबतही योग्य सूचना दिल्या असून त्यांचे पालन केले जाईल. – पप्पू कांबळे, चालक, एसटी महामंडळ