पुणे : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध योजनांतील सवलतधारक किंवा योजनेअंतर्गत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी यापुढे ‘स्मार्ट कार्ड’ बंधनकारक करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाने व्यवहारात पारदर्शकता यावी आणि प्रवाशांना सुलभ सेवा मिळावी म्हणून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) या डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीचा अवलंब करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून नुकताच ईबिक्स टेक्नोलॉजिस लि. आणि एनएसडीएल पेमेंट्स बँक यांच्याशी करार केला आहे.

एसटी महामंडळांतर्गत महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांना ५० टक्के सवलत, ६५ ते ७५ वयोगटातील प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत, ७५ वर्षांपेक्षा पुढील ज्येष्ठांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत विनाशुल्क प्रवास, शालेय विद्यार्थ्यांसाठी ६६.६७ टक्के दरात मासिक पास योजना, बारावीपर्यंत मुलींना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पास, शाळा-महाविद्यालयांमध्ये थेट पास वितरण, स्वातंत्र्य सैनिक आणि एक साथीदार, अधिस्वीकृतीधारक पत्रकार, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेल्यांना मोफत प्रवास, सामाजिक दुर्लभ घटकांमधील ३० टक्के सवलत, मासिक, त्रैमासिक पासधारकांना ५० टक्के सवलत, ठरावीक दिवसांचा पास, आवडेल तेथे कोठेही प्रवास, एसटी संगे तीर्थाटन योजना, आगाऊ आरक्षण अशा सुविधा दिल्या जात आहेत. त्याचा लाभ घेऊ इच्छिणारे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, अपंग, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि इतर समाजघटकांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

कोणाला मिळणार एनसीएमसी कार्ड?

  • विद्यार्थी : शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सरल’ क्रमांकाशी जोडलेले कार्ड.
  • ज्येष्ठ नागरिक व महिला : अमृत ज्येष्ठ नागरिक, सर्वसाधारण ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना आधार संलग्न कार्ड
  • अपंग प्रवासी : अपंग प्रमाणपत्र क्रमांक जोडून विशेष सुविधा असलेले कार्ड
  • पुरस्कारार्थी व पत्रकार : स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालय किंवा मुख्यालय आगारामार्फत वितरण

कार्डची प्रमुख वैशिष्ट्ये

सवलतधारकांना नवीन कार्ड काढण्यासाठी वस्तू आणि सेवा करासह (जीएसटी) १९९ रुपये मोजावे लागणार आहेत. जुने स्मार्ट कार्ड असल्यास ते जमा करून १४९ रुपयांत नवीन कार्ड काढावे लागेल. वाॅलेट मर्यादा किमान १०० रुपयांपासून ५० रुपयांच्या पटीतील रुपयांपर्यंत असेल. कार्डमध्ये ईटीआयएएम मशीनद्वारे, संकेतस्थळाद्वारे किंवा ॲपमधून रिचार्ज करता येणार आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सोयीसाठी अधिकृत तीन हजारपेक्षा अधिक मध्यस्थींची नियुक्ती करण्यात आली असून बस स्थानकावरच नोंदणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. ज्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा सहज फायदा घेता येणे शक्य होईल, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

परंपरागत प्रवासी व्यवस्थेला डिजिटल स्पर्श देणारा हा टप्पा आहे. तिकिटासाठी सुट्या पैशांची कमतरता, पैशांची टंचाई किंवा या गोष्टी एनसीएमसी कार्डमुळे इतिहासजमा होतील. आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता निर्माण होणार असून प्रवाशांना सुलभ, सुरक्षित प्रवास करता येणार आहे. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री.