दिवाळीमुळे पर्यटकांची भटकंतीला पसंती

पुणे : करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने आणि राज्य शासनाकडून बहुतांश निर्बंधांतून सवलत देण्यात आल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पुणे विभागातील निवासस्थाने ९० टक्के  आरक्षित झाली आहेत. त्यामुळे पर्यटकांकडून भटकंतीला पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरल्याने राज्य शासनाकडून बहुतांश निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.  परिणामी गेल्या पाऊणे दोन वर्षांपासून घरातच असलेले पर्यटक दिवाळी सुटीनिमित्त भटकंतीसाठी बाहेर पडत आहेत. महामंडळाची पुणे विभागातील ९० टक्के  निवासस्थाने नोव्हेंबर, तर डिसेंबर महिन्यासाठी ७० टक्के निवासस्थाने पर्यटकांकडून आरक्षित करण्यात आली आहेत.

   याबाबत एमटीडीसी पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे म्हणाले, की यंदा पाऊस चांगला झाला असल्याने जिल्ह्यातील घाटमाथ्यावरील निसर्गरम्य ठिकाणी धबधबे ओसंडून वाहत आहेत. पाऊस संपून थंडीची चाहूल लागल्याने पर्यटकांची पावले आपसुकच पर्यटनाकडे वळत आहेत. पुणे विभागात कार्ले, भाजे, तारकर्ली, हरिहरेश्वर, दापोली, महाबळेश्वर, पानशेत, भीमाशंकर, माळशेज, नाणेघाट अशी अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. यामध्ये प्रामुख्याने तारकर्ली येथील समुद्रकिनारा, महाबळेश्वर, वाई, पाचगणी या ठिकाणांना पर्यटकांकडून सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे.

जाहीर केलेल्या सवलती

ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी, आजी-माजी सैनिक आणि अपंग नागरिकांसाठी आगावू आरक्षण करताना विशेष सवलत देण्यात येत आहे. खोल्यांचे समुह आरक्षण (२० खोल्यांपेक्षा जास्त) केल्यासही सवलत दिली जात आहे. तसेच निवासस्थानी मोफत न्याहारीची सुविधा जाहीर केली आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून लग्नापूर्वीचे छायाचित्रण आणि विवाह सोहळ्यांची सोयही पर्यटक निवासस्थानी करण्यात येत आहे. पर्यटकांसाठी वर्क फ्रॉम नेचर’ आणि वर्क विथ नेचर या संकल्पनेंतर्गत काही निवासस्थानी वायफाय सुविधा पुरवण्यात येत आहे. महामंडळाची पुणे विभागातील सर्व निवासस्थाने सुरू असून  ६६६.े३ूि.ूङ्म या संकेतस्थळावर आरक्षण सुरू करण्यात आले आहे, असेही हरणे यांनी सांगितले.

महामंडळाच्या निवासस्थानी राहण्यासाठी ऑनलाइन आरक्षण सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार नोव्हेंबरअखेरपर्यंत ९० टक्के, तर डिसेंबर महिन्यासाठी ७० टक्के निवासस्थानांमधील खोल्या आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी महामंडळावर एकप्रकारे विश्वास दाखवला आहे. निवासस्थानी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची करोनाच्या पार्श्वभूमीवर शरीर तापमान, शरीरातील प्राणवायूचे प्रमाण मोजले जात आहे. तसेच पर्यटकांसमोर त्यांना देण्यात येणाऱ्या खोल्या निर्जंतूक करण्यात येत आहेत. करोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. – दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी