पुण्यात Black Fungus चा फैलाव; आत्तापर्यंत ३५३ बाधित तर २० मृतांची नोंद!

पुण्यातही म्युकरमायकोसिसचा फैलाव होऊ लागला असून उपलब्ध औषधांचा साठा मात्र अपुरा आहे!

black fungus1
प्रातिनिधिक छायाचित्र
पुण्यात करोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्यानंतर आता करोनापाठोपाठ आलेल्या Black Fungus अर्थात काळी बुरशीनं (म्युकरमायकोसिस) देखील हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये तब्बल ३५३ म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशभर आरोग्ययंत्रणांसमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या म्युकरमायकोसिसनं पुण्यासमोर देखील आव्हान उभं केलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यात वाढणारा म्युकरमायकोसिस आणि तुलनेनं अपुरे असणारे इंजेक्शन याविषयी भूमिका स्पष्ट केली होती. त्यामुळे आता अपुऱ्या औषधांच्या जोरावर म्युकरमायकोसिससारख्या जीवघेण्या आजाराशी पुणेकरांना लढा द्यावा लागणार आहे.

केंद्र सरकारने नुकताच म्युकरमायकोसिसचा समावेश साथरोग नियंत्रण कायद्यामध्ये केल्यामुळे देशभरातील सर्व रुग्णालये, आरोग्य केंद्रे आणि प्रशासकीय यंत्रणा यांना या काळी बुरशीची बाधा झालेल्या रुग्णांची आकडेवारी केंद्रीय यंत्रणांकडे देणं आवश्यक ठरलं आहे. त्यानुसार आता देशभरातून या रुग्णांची आकडेवारी येऊ लागली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत आढळून आलेल्या ३५३ म्युकरमायकोसिसच्या रुग्णांपैकी तब्बल १६७ रुग्ण हे पुणे शहरातले आहेत. त्याशिवाय ११ रुग्ण हे पुणे ग्रामीणमधले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्येही फैलाव!

पुणे शहराप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्ये देखील म्युकरमायकोसिसचा फैलाव होऊ लागला आहे. आकडेवारीनुसार, बाधित रुग्णांपैकी एकूण ४५ रुग्णांवर सध्या पुण्यातल्या ससून सरकारी रुग्णालयात म्युकरमायकोसिसचे उपचार सुरू आहेत. “करोना काळात गंभीर झालेल्या मात्र नंतर त्यावर मात करून बऱ्या झालेल्या किंवा सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांना प्रामुख्याने म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचं दिसून येत आहे. त्यामध्या ४० ते ५० वर्षे आणि त्यावरील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे”, अशी माहिती पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेतील अतिरिक्त आरोग्य प्रमुख प्रविण सावळे यांनी दिली आहे.

वाचा सविस्तर – म्युकरमायकोसिस साथरोग!

एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये आत्तापर्यंत ९० रुग्णांना म्युकरमायकोसिसची बाधा झाली असून १० जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमधल्या रुग्णालयांमधून यासंदर्भातली आकडेवारी मिळवण्यात आली आहे. मृत्यूंपैकी ९ ससून रुग्णालयात तर एक मृत्यू पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात झाला आहे.

इंजेक्शन्ससाठी केंद्राकडे पाठपुरावा

“म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या इन्जेक्शन्स मात्र राज्याकडे पुरेशी उपलब्ध नाहीत. त्यांचा तुटवडा आहे. मात्र, त्यासाठी आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करत आहोत. या इंजेक्शन्ससाठी थेट उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, त्यांना सर्व इन्जेक्शन्स केंद्राकडे देणं बंधनकारक असल्याने ते थेट देऊ शकत नाहीत”, अशी माहिती अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

केंद्राचे राज्य सरकारांना आदेश!

म्युकरमायकोसिसचा साथरोग कायद्यात समावेश करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य सरकारांना निर्देश दिले आहेत. “तुम्हा सर्वांना विनंती आहे की म्युकरमायकोसिसचा समावेश साथरोग कायदा १८९७ अंतर्गत करण्यात यावा. यामध्ये सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये, आरोग्य सेवा केंद्र, वैद्यकीय महाविद्यालये यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करतील. यामध्ये रुग्णाची तपासणी, आजाराचं निदान आणि उपचार व्यवस्थापन यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर यांनी दिलेल्या सूचनांचं देखील पालन होईल. याशिवाय, म्युकरमायकोसिसचे संशयित आणि बाधित अशा रुग्णांची आकडेवारी आरोग्यविभागाला जिल्हानिहाय पुरवली जावी. यामध्ये जिल्ह्यातील मुख्य वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेचा समावेश असेल”, असं आरोग्य मंत्रालयाने म्युकरमायकोसिससंदर्भात जारी केलेल्या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक आहे. नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mucormycosis patients in pune black fungus in pimpri chinchwad rural pmw