Mugdha Deshmukh Pune Death Investigation Updates: लंडनमध्ये एमबीए पदवीच्या शिक्षणासाठी गेलेल्या मुलीचा मृतदेह पुण्यातील फ्लॅटमध्ये आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली. मुग्धा देशमुख (वय ३४) या मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर या प्रकरणातील गुढ वाढले आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. पोलिसांनी सोसायटीमधील शेजाऱ्यांची चौकशी केली असता मृत मुलगी फारशी कुणात मिसळत नव्हती, तिच्या घरी कोणाची ये-जा नव्हती आणि शेजाऱ्यांशीही तिचा संवाद नगण्य होता, अशी माहिती समोर आली. पुण्यातील फ्लॅटमध्ये मृतदेह आढळण्याच्या आठवडाभरापूर्वीच मुग्धा देशमुख हिने आपण बाहेरगावी जात असल्याचे सांगून घरकाम करणाऱ्या महिलेला कामावरून येऊ नको असे सांगितले होते.
या पार्श्वभूमीवर मुग्धा देशमुख हिच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. मुग्धाच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. लंडनहून परतल्यानंतर तिने कुटुंबीयांना अंधारात का ठेवले? याचाही शोध पोलीस घेत आहेत.
मुग्धाचे कुटुंबीय छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. मुग्धा जुलै २०२५ मध्ये उच्चशिक्षणासाठी लंडनला गेली होती. मात्र पालकांना कोणतीही कल्पना न देता ती ऑगस्ट २०२६ मध्ये भारतात परतली आणि पुण्यातील फ्लॅटमध्ये भाड्याने राहू लागली होती.
दरम्यान मुग्धाशी संपर्क होत नसल्याने तिचे वडील आणि निवृत्त महापालिका अभियंता अविनाश देशमुख यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता.

दार आतून बंद, दुर्गंधीनंतर उलगडा
तपासाची चक्रे फिरवत छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे पथक बुधवारी (२८ ऑक्टोबर) पहाटे ५.३० वाजता पुण्याच्या एका गृहनिर्माण सोसायटीतील टॉवर क्रमांक ११ मधील फ्लॅट क्रमांक २३०७ येथे पोहोचले. एका शेजाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता. पोलिसांनी दुसऱ्या चावीची व्यवस्था करून दरवाजा उघडला असता घरातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. आतमध्ये बेडवर मुग्धाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला.
हा फ्लॅट एका लष्करी अधिकाऱ्याचा असून ते सध्या दुर्गम भागात कर्तव्य बजावत असल्याने त्यांच्याशी तातडीने संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात देण्यात आली आहे. मुग्धा अधिकृत भाडेकरार करून ऑगस्ट महिन्यापासून येथे राहत होती. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तिचे कोणाशीही बोलणे नव्हते. केवळ सोसायटीच्या गोल्फ कोर्सवर ती कधीतरी फिरायला जाताना दिसायची; मात्र तिचा कोणाशीही सामाजिक संपर्क नव्हता. सोसायटीच्या सुरक्षारक्षकानेही तिच्या घरी कधी कोणी पाहुणे आल्याचे पाहिले नसल्याचे सांगितले.
घरकाम करणाऱ्या महिलेला कमी केले
प्राथमिक माहितीत असे समोर आले आहे की, २१ ऑक्टोबर रोजी मुग्धाने घरकाम करणाऱ्या महिलेला पूर्ण महिन्याचा पगार दिला आणि आपण बाहेरगावी जात असल्याचे सांगून कामावर न येण्याची सूचना केली. ती स्वतःच जेवण बनवायची किंवा बाहेरून मागवायची, असेही या महिलेने सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे, मुग्धाच्या फ्लॅटच्या परिसरावर नजर ठेवणारा सीसीटीव्ही कॅमेरा गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याचे उघड झाले आहे.
लंडनवरून परतल्याचे का लपवले?
या प्रकरणाचा तपास करणारे उपनिरीक्षक किरण बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुग्धाने एप्रिल महिन्यादरम्यान हा फ्लॅट भाड्याने घेतला होता आणि ती ऑगस्ट-सप्टेंबरपासून येथे प्रत्यक्ष राहत होती. पुण्यात असताना ती एमबीएच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवत असल्याचे समजते. कुटुंबीयांशी तिचा संपर्क केवळ व्हॉट्सॲप मेसेजपुरताच मर्यादित होता. लंडनहून परत आल्याची बाब तिने कुटुंबीयांपासून का लपवून ठेवली, हा तपासातील महत्त्वाचा पैलू आहे.
“मुग्धा देशमुख हिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी सखोल तपास सुरू आहे. तिचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल,” अशी माहिती शिरगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी दिली.
