पुणे : ‘जगभरात बलाढ्य देशातील तथाकथित प्रतिष्ठित व्यक्तींनी मुलींवर, महिलांवर अत्याचार केले आहेत. ‘एप्स्टीन फाइल्स’ प्रकरणातील अत्याचाराचे विविध कंगोरे समोर आल्यावर जग सुन्न झाले. नुकतेच बदलापूरमध्ये स्त्रियांचे वर्गीकरण करून स्त्री बीजांची किंमत ठरवण्यात आली. हा बाजार स्त्रियांच्या देहापर्यंत येणे संतापजनक आहे. सध्या एकनिष्ठता, प्रामाणिकपणा आणि न्याय हे सर्व संस्कार विकायला काढण्यात आले आहेत,’ अशा शब्दांत ज्येष्ठ कामगार नेत्या आणि लेखिका मुक्ता मनोहर यांनी संताप व्यक्त केला. ‘महिलांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले पाहिजे, तरच न्याय मिळेल,’ असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या वतीने आयोजित ‘गांधी दर्शन शिबिरात’ मनोहर बोलत होत्या. ‘जागतिक महिला दिन आणि स्त्रीमुक्ती चळवळ’ या विषयावर त्यांनी भाष्य केले. कवयित्री डॉ. सिसिलिया कार्व्हालो, स्त्री आणि लिंगभाव अभ्यासक संजयकुमार कांबळे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, गांधी स्मारक निधीचे अन्वर राजन, प्रवीण सप्तर्षी, अंजली देशमुख, ज्ञानेश्वर मोडक, मधुकर गायकवाड या वेळी उपस्थित होते.

संस्कारांची विक्री अन् देहाचा बाजार

मनोहर म्हणाल्या, ‘सध्या एकनिष्ठता, प्रामाणिकपणा आणि न्याय हे सर्व संस्कार विकायला काढण्यात आले आहेत. बदलापूरमध्ये स्त्रियांचे ज्या प्रकारे वर्गीकरण करून त्यांच्या बीजांची किंमत ठरवण्यात आली, तो प्रकार मानवी मूल्यांना हरताळ फासणारा आहे. स्त्रियांच्या देहाचा असा बाजार मांडला जाणे हा समाजाचा नैतिक पराभव आहे.’

मनोहर म्हणाल्या, ‘समाजातील समानता, स्वातंत्र्य आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी स्त्री चळवळीने महत्त्वाचे योगदान दिले. अमेरिकेत महिला त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्या. अनेक वर्षे त्यांना संघर्ष करावा लागला, तेव्हा त्यांना न्याय मिळाला. महिलांनी उच्चशिक्षित होण्याबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जगले पाहिजे. त्यांनी आपले अज्ञान दूर करून महिलांना जागृत केले पाहिजे.’

न्यायासाठी आता रस्त्यावरचा संघर्ष हवा!

केवळ घरात बसून किंवा चर्चा करून न्याय मिळणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी महिलांना संघर्षाचे आवाहन केले. ‘कंत्राटी कामगार महिलांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळाला पाहिजे. नव्या युगात आपण बेजबाबदारपणे वागत आहोत. महिलांना असंख्य आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. अशा काळात अन्याय, अत्याचार होत असल्यास महिलांनी पुढे आले पाहिजे,’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.

डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी ‘स्वातंत्र्यसेनानी सरोजिनी नायडू’ यांनी दिलेल्या योगदानाची माहिती दिली. शिबिराच्या समारोप सत्रात संजयकुमार कांबळे यांनी ‘दक्षिण आशियातील पुरुषसत्तेचे स्वरूप : स्त्रीवादी आकलन’ या विषयावर भाष्य केले. अरुणा तिवारी यांनी सूत्रसंचालन केले. सूरज कुलकर्णी आभार मानले.

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि महिलांचे अज्ञान

उच्चशिक्षणासोबतच महिलांनी वैचारिक दृष्टिकोन बदलण्याची गरज मुक्ता मनोहर यांनी व्यक्त केली. त्या म्हणाल्या…

* वैज्ञानिक विचार : महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून जगले पाहिजे आणि स्वतःमधील अज्ञान दूर केले पाहिजे.

* जागृती : सुशिक्षित महिलांनी केवळ स्वतःचा विकास न पाहता इतर महिलांनाही जागृत करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

* कंत्राटी कामगार : कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या महिलांच्या हक्काचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे.