पुणे : मुळशी धरणातील पाणी सोलापूरकडील पूर्वेकडील दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्याच्या दृष्टीने राज्य पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी पाचशे कोटी रुपयांचा खर्च करून बोगदा बांधण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही तत्वत: मान्यता दिली असून या बोगद्याद्वारे मुळशी धरणातील पाणी मुळा-मुठा आणि भीमा नदी खोऱ्यात आणण्याचे नियोजित आहे.

दरम्यान, बोगद्याचा प्रस्तावाला अंतिम मान्यता मिळणे आणि त्याचे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार असल्यामुळे थेट नदीपात्रातून थेट पाणी सोडण्यात येण्यासाठीही प्रयत्न सुरू झाले असून दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला असून त्यांच्या या प्रस्तावानुसार राज्य स्तरावर यासंदर्भात बैठकाही झाल्या आहेत. दरम्यान, बोगद्याद्वारे मुळशी धरणातील पाणी मुळा-मुठा आणि भीमा नदीच्या खोऱ्यात आणण्याच्या प्रकल्पाचा खर्च राज्य शासन करणार की हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) या माध्यमातून माध्यमातून उभारला जाणार, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, राज्य शासनाकडूनच खर्चाची तरतूद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा प्रस्ताव महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. मुळशी धरणातील पाण्याचा वापर प्रामुख्याने वीजनिर्मितीसाठी केला जातो. वीजनिर्मितीनंतर हे पाणी पश्चिमेकडे वाहून जाते. त्यामुळे पूर्वेकडील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त भागाला या पाण्याचा लाभ मिळत नाही. वीजनिर्मितीसाठीच्या पाण्याचा विसर्ग कमी करून ते पाणी पूर्वेकडे वळविण्याचा पर्याय पुढे आला आहे. त्याला तत्वत: मान्यता मिळाल्याची माहिती दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांनी दिली.

मुळशी धरणातील पाणी पूर्वेकडे आणण्यासाठी बोगदा बांधण्याचा पर्याय विचाराधीन आहे. या कामासाठी अंदाजे ४०० ते ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, हा खर्च टीडीआरच्या माध्यमातून उभारायचा की राज्य शासनाने निधी उपलब्ध करून द्यायचा, यावर अद्याप स्पष्टता नाही. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची शक्यता असली, तरी त्याबाबत अंतिम निर्णय आणि प्रकल्पाची आर्थिक रचना निश्चित झालेली नाही.

मुळशी धरणातील पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते आणि ते पश्चिमेकडे वाहून जाते. मात्र, पूर्वेकडील पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील अनेक गावांना सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे वीजनिर्मितीसाठीच्या पाण्याचा विसर्ग कमी करून ते पाणी मुळा-मुठा आणि भीमा नदीत आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यानुसार पाच टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे दौंडसह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा आणि पशुधनाच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होण्याची शक्यता आहे.

भीमा नदीमार्गे उजनी धरणातील पाणीसाठ्यात भर पडल्यास सोलापूर जिल्ह्यालाही त्याचा लाभ होणार आहे मात्र, बोगद्याचा मार्ग, पाणी वळविण्याची क्षमता, तांत्रिक व्यवहार्यता, वीजनिर्मितीवरील परिणाम आणि निधीची उपलब्धता या बाबी निश्चित झाल्यानंतरच या प्रस्तावाच्या अंमलबजावणीचा मार्ग स्पष्ट होणार आहे.

मुळशी धरणातील पाणी बोगद्यामार्गे पूर्व भागाला देण्याचा प्रस्तावित आहे. त्याला राज्य पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. बोगद्याला मंजुरी आणि त्याचे काम पूर्ण होईपर्यंत नदीपात्रातून पाणी सोडण्यात यावे, असे पत्र राज्य शासनाला देण्यात आले आहे. – राहुल कुल, आमदार, भाजप, दौंड विधानसभा मतदारसंघ