पुणे : मुळशी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा पाठिंबा घेऊन सत्ता मिळविण्याचा भाजपमध्ये प्रवेश केलले काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा डाव राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांनी उधळून लावला. मांडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’त समेट घडवून आणल्याने अजित पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’च्या मंदा शेळके यांची सभापतीपदी, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे दगडू करंजवणे यांना उपसभापतिपदी निवड झाली.

भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्यानिमित्ताने थोपटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्यात ठिणगी पडली. या पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी माजी आमदार थोपटे यांच्या प्रयत्नातून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात नवीन राजकीय समीकरणे होणार असल्याची चर्चा होती. मात्र, आमदार मांडेकर यांनी हा डाव उधळून लावल्याने माजी आमदार थोपटे यांच्यावर नामुष्की ओढवली.

या पंचायत समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने शिरकाव केला. पंचायत समितीच्या सहापैकी तीन जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला, तर दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मिळाल्या. भाजपला एका जागेवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा माजी आमदार थोपटे यांचा प्रयत्न होता. त्यादृष्टीने राजकीय डावपेच सुरू होते.

मांडेकर यांच्या ताब्यातून ही पंचायत समिती खेचून घेण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष यांच्यात बोलणी सुरू झाल्याची चर्चा होती. त्यामध्ये माजी आमदार थोपटे हे महत्त्वाची भूमिका बजावत होते. ही बोलणी यशस्वी झाली असती, तर भाजप आणि शरद पवारांची ‘राष्ट्रवादी एकत्र येऊन नवीन राजकीय समीकरण होण्याची शक्यता होती. मात्र, आमदार मांडेकर यांनी माजी आमदार थोपटे यांचे प्रयत्न अयशस्वी ठरवले. दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकत्र आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या मंदा शेळके यांची सभापतीपदी, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे दगडू करंजवणे यांची उपसभापतिपदी वर्णी लागल्याचे स्पष्ट झाले.