पिंपरी : सदनिका (फ्लॅट) विक्रीचा बनाव करून एका व्यक्तीची १३ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार काशीद वस्ती, पिंपळे गुरव येथे उघडकीस आला आहे. ही घटना २९ जुलै २०२१ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत घडली.

या प्रकरणी चंदू लक्ष्मण राठोड (३८, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राज लक्ष्मण राठोड याला पोलिसांनी अटक केली आहे. दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगणमत करून फिर्यादीला २० लाख रुपयांत सदनिका देण्याचे आश्वासन दिले. सुरुवातीला ५ लाख रुपये घेऊन करारनामा केला आणि त्यानंतर वेळोवेळी रोख व ऑनलाइन स्वरूपात एकूण १३ लाख १० हजार रुपये घेतले. फिर्यादीला सदनिकेचा ताबा दिला, मात्र खरेदी खत करून देण्याऐवजी टाळाटाळ केली. त्यानंतर फिर्यादीला कोणतीही कल्पना न देता आरोपींनी तिसऱ्या व्यक्तीला सदनिकेचे खरेदी खत करून दिले. इतकेच नव्हे तर, फर्निचर पाहण्याच्या बहाण्याने छायाचित्र काढून फिर्यादीच्या नावावर परस्पर २२ लाखांचे कर्ज काढून फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

निगडीत लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली. ही कारवाई मंगळवारी (२० जानेवारी) रात्री निगडी येथे घडली.

या प्रकरणी पोलीस शिपाई गणेश कारोटे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी लॉजचा व्यवस्थापक अस्लम इलाही शेख (२४, लातूर) याला अटक केली असून, एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला. या व्यवसायातून मिळालेल्या रकमेवर आरोपी आपली उपजीविका भागवत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. पीडित महिलेची पोलिसांनी सुटका केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने दोघांना मारहाण

दिलेले उसने पैसे परत मागण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्राला शिवीगाळ करत दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (२१ जानेवारी) एमआयडीसी भोसरी येथे घडली.

या प्रकरणी विनायक बसप्पा कुरी (२७, चिंचवडगाव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सलमान शेख (३३, भोसरी) आणि अरबाज शेख (२७, भोसरी) यांना अटक केली असून त्यांच्या एका साथीदारावरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनायक आणि त्यांचे वडील दोघेजण आरोपी सलमान याला दिलेली ॲडव्हान्स रक्कम परत घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी “मी तुला पैसे देत नाही, काय करायचे ते कर” असे म्हणून आरोपीने फिर्यादीच्या वडिलांना हाताने मारहाण केली. तसेच इतर आरोपींनी शिवीगाळ करत फिर्यादीच्या कपाळावर आणि ओठावर दगडाने मारून त्यांना जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.

बावधनमध्ये गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक

बेकायदेशीरपणे स्वतःजवळ गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. ही कारवाई बुधवारी (२१ जानेवारी) रात्री रामनगर, बावधन येथे पुणे-बेंगलोर हायवे लगत करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई अमोल वेताळ यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनिकेत अर्जुन मंडलिक (२५, सोमेश्वरवाडी, पाषाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत हा रामनगर भागात संशयास्पदरीत्या वावरत असताना मिळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस विनापरवाना सापडले. बावधन पोलीस तपास करत आहेत.

शिरगाव परिसरात दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर बेकायदेशीरपणे दारूभट्टीवर पोलिसांनी छापा मारला. या कारवाई मध्ये पोलिसांनी सहा हजार लिटर गूळ मिश्रित रसायन नष्ट केले आहे. ही कारवाई बुधवारी (२१ जानेवारी) दुपारी करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस शिपाई रामेश्वर जाधवर यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २५ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पवना नदीच्या काठावर दारूभट्टी लावली. या दारूभट्टीबाबत पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी दोन लाख १२ हजार रुपये किमतीचे सुमारे सहा हजार लिटर गुळमिश्रित कच्चे रसायन नष्ट केले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी झाडाझुडपांचा फायदा घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. शिरगाव पोलीस तपास करत आहेत.