पुणे : मुंबई-बेंगळुरू प्रवास आता साडेपाच तासांत करता येणार आहे. या मार्गाच्या पहिल्या टप्प्याची निविदा काढली असून, त्यात पुण्यापर्यंत तीन टप्प्यांमध्ये काम करण्यात येणार आहे. फलटणमधून हा मार्ग बेंगळुरूपर्यंत जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग-९६५) कामाची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

गडकरी म्हणाले, ‘हा महामार्ग मुंबईतील अटल पुलानंतर पुढे चार किलोमीटरनंतर सुरू होईल. उत्तरेतून दक्षिणेत जाण्यासाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा सोलापूर असा मार्ग होता. आता ही वाहतूक सुरत येथे थांबवून सुरत, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, कर्नूल, कन्याकुमारी, चेन्नई, बेंगळुरू, मंगळुरू आणि हैदराबाद अशी वळविणार आहोत. चेन्नई ते दिल्ली अंतर ३२० किमीने कमी होईल. चेन्नई, बेंगळुरूची वाहतूक सुरत येथूनच वळणार असल्याने सोलापूरची वाहतूक ४०-५० टक्क्यांनी कमी होईल.’

पुणे-नागपूर साडेचार तासांत

पुणे ते छत्रपती संभाजीनगर रस्ताही मंजूर झाला असून, पुणे ते नागपूर प्रवास साडेचार तासांत करण्याचा प्रयत्न आहे. पालखी मार्गामुळे या भागाला महत्त्व येईल. कंटेनर ट्रॅफिक वाढेल, गोदामे आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल. नवी मुंबई विमानतळासाठी ३० मीटरचे उड्डाणपूल व रस्ते आधीच तयार केले, तसे नियोजन पुण्याच्या पुरंदर विमानतळासाठीही करता येईल, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

टोलमाफी नाहीच

देशातील टोलनाक्यांवर आता बॅरिअर राहणार नाहीत. वाहन क्रमांक आणि ‘फास्टॅग’च्या आधारे थेट बँक खात्यातून टोल वसूल केला जाईल. कारचालकांसाठी तीन हजार रुपयांचा वार्षिक पास दिला असून, त्यामुळे आर्थिक दिलासा मिळेल. मात्र, कोणालाही टोलमाफी देता येणार नाही, असेही केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

नव्या प्रकल्पांची घोषणा

  • जेजुरीत २ किमी लांबीचा उड्डाणपूल. त्यासाठी २५० कोटी रुपये तरतूद
  • फलटण शहरात रस्ते रुंदीकरणासाठी ९७ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी
  • नीरा रस्त्यावर ७२ मीटर लांबीचा रेल्वे ओव्हर ब्रीज
  • टेंभुर्णी-पंढरपूर दरम्यान साडेनऊ किलोमीटर लांबीचा पंढरपूर बाह्यवळण मार्ग. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पंढरपूरला पूर्णपणे रिंग रोड होणार
  • दोन्ही पालखी मार्ग एकमेकांना मिळतात, त्या तोंडले गावात उड्डाणपूल. त्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद