पिंपरी : नवीन खरेदी केलेल्या आलिशान मोटारीची रील काढून मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी करणाऱ्या मोटार मालक, छायाचित्रकार आणि वाहनचालकासह इतरांविरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बावधन पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सुरज टिळेकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २७ ऑगस्ट रोजी नवीन मोटार खरेदी केली. या मोटारीचे रील्स आणि चित्रफित तयार करण्यासाठी त्यांच्यासोबत आणखी एका मोटारीसह अन्य वाहने महामार्गावर आणण्यात आली. चित्रीकरणासाठी ही वाहने रस्त्यावर एकत्रितपणे उभी करण्यात आली. काही वाहने रस्त्यात थांबविण्यात आली तर, काही वाहने एकमेकांच्या समांतर आणि अगदी जवळून चालविण्यात आली.
याशिवाय पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोन व ड्रोनसदृश कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रण करण्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अन्वये मनाई आदेश लागू असतानाही चित्रीकरण केले. रील तयार करताना वाहनांचा वेग अचानक कमी करणे, वाहने थांबविणे तसेच एकत्रितपणे धोकादायक पद्धतीने वाहन चालविण्याचे प्रकार झाल्याचे समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या चित्रफितीद्वारे निदर्शनास आले. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला. वाहनांच्या रांगा लागल्याने अन्य वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारामुळे सार्वजनिक मार्गावरील वाहनचालकांच्या जीवितास आणि सुरक्षिततेस धोका निर्माण झाला. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा भारतीय न्याय संहितेचे कलम तसेच मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.
