पुणे : सोलापूर रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामामुळे ‘मुंबई-चेन्नई’ रेल्वे मार्ग अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे. सोलापूर यार्डातील १०३ वर्षे जुना रोड ओव्हर ब्रिज (ROB) डिसेंबर २०२५ मध्ये पडण्यात आला. त्यानंतर रेल्वेने गाड्यांच्या वर असलेल्या विजेच्या तारांच्या व्यवस्थेत (OHE) बदल करण्यास सुरुवात केली आहे.
जुन्या पुलाखाली रेल्वेच्या विजेच्या तारांसाठी उपलब्ध जागा मर्यादित होती. त्यामुळे सोलापूर यार्डात विजेसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. या मर्यादांमुळे मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांच्या वेगावर परिणाम होत होता. आता नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. यादरम्यान विजेसाठीची तात्पुरती व्यवस्था बदलून कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात येत आहे.
या बदलाची गरज का ?
जुन्या पुलामुळे विजेच्या तारांभोवती आवश्यक सुरक्षित अंतर राखणे अवघड होत होते. आता पूल पडण्यात आल्यानंतर विजेसाठी अधिम सक्षम यंत्रणा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून, नवीन व्यवस्थेनंतर सोलापूर यार्डातून ये-जा करणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होणारा असल्याचा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे.
मुंबई-चेन्नई या महत्वाच्या रेल्वे मार्गावर नव्या यंत्रणेचे काम करण्यात येत आहे. या व्यस्त रेल्वे मार्गावरील गाड्यांची वाहतुकीला अडथळा आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली. या प्रकल्पातील विविध विभागांच्या समन्वयानंतर २२ मे २०२६ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम शक्य तितक्या कमी अडथळ्यांत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कामासाठी सुमारे ३० कर्मचाऱ्यांची चार विशेष पथके तैनात केली आहेत. याशिवाय दोन टॉवर वॅगन आणि एक रेल्वे क्रेनही वापरण्यात येत आहे. कडक उन्हातही कर्मचारी सातत्याने काम करत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रवाशांचा फायदा काय ?
सोलापूर स्थानकातून जाणारा मार्ग हा मुंबई-चेन्नई रेल्वे कॉरिडॉरचा महत्त्वाचा भाग आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील रेल्वे परिचालन अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुरळीत होण्यास मदत होईल. या मार्गावरून धावणाऱ्या प्रवासी आणि मालगाड्यांच्या वाहतुकीलाही याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. तसेच नवीन रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी काही रेल्वे संरचनांमध्ये बदल करावे लागत होते. रेल्वेने हे अडथळे दूर केल्यामुळे पुलाचे काम पुढे नेणे सोपे झाले आहे. हा पूल पूर्ण झाल्यानंतर सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि रस्ते संपर्क व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे, असा दावा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून करण्यात आला आहे.
