पुणे पोलिसांनी अटक करण्याआधी किरण गोसावीकडून मंत्र्यांचा उल्लेख; म्हणाला, “मंत्री वैगैरे जेवढे याच्या मागे…”

“मुंबई पोलिसांनी केस हाती घेतली तर सर्वात प्रथम प्रभाकर साईलची माहिती काढावी. मंत्री वैगैरे जेवढे याच्या मागे आहेत त्या सर्वांची माहिती काढावी”

Pune Police, NCB, Mumbai Drugs Case, Aryan KHan Drugs Case, किरण गोसावी, समीर वानखेडे, किरण गोसावीला अटक, किरण गोसावी अटक, प्रभाकर साईल
(संग्रहित छायाचित्र)

मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या अटकेत आहे. आर्यन खानवरील कारवाईवरुन सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आरोपांना सुरुवात केली तेव्हा किरण गोसावी नावाचा उल्लेख केला होता. याशिवाय आर्यन खानसोबत सेल्फी काढल्यामुळेही तो चर्चेत होता. क्रूझवरील संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला अखेर पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या एका गुन्ह्याखाली अटक केली आहे.

एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावीला अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

दरम्यान पुणे पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी किरण गोसावी याने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून यामध्ये त्याने आपल्याविरोधात आरोप करणाऱ्या अंगरक्षक प्रभाकर साईलची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यात त्याने सत्ताधारी किंवा विरोधातील नेत्याने आपल्या पाठीशी उभं राहावं असंही म्हटलं आहे.

“मी प्रभाकर साईलविषयी काही बोलू इच्छितो. सॅम डिसूझासोबत कोणाचं संभाषण झालं?; किती पैसे कोणी घेतले? प्रभाकर साईलला गेल्या पाच दिवसांत काय ऑफर आल्या आहेत? हे त्याच्या मोबाइलमधून स्पष्टपणे समजेल. प्रभाकर साईल आणि त्याच्या दोन्ही भावांचे सीडीआर रिपोर्ट आणि मोबाइल संभाषण काढावे,” अशी मागणी किरण गोसावीने केली आहे.

“मी प्रभाकरसोबत इथून तिथून पैसे आणण्यासोबत बोललो असेन तर माझे मोबाइल चॅट्स काढा. माझा आयात निर्यातीचा व्यावसाय आहे. त्यामध्ये पूर्वीच्या काही चॅट्स असतील ज्यामध्ये व्यावसायातील पैशांची देवाण-घेवाण याबद्दल चर्चा असायची तिथे मी त्याला पाठवायचो. पण २ तारखेनंतरचे याचे चॅट्स पाहावेत आणि डिलीट केलेले मेसेजही काढावेत एवढी विनंती आहे,” असंही त्याने म्हटलं आहे.

“मुंबई पोलिसांनी केस हाती घेतली तर सर्वात प्रथम याची माहिती काढावी. मंत्री वैगैरे जेवढे याच्या मागे आहेत त्या सर्वांची माहिती काढावी. मी मराठी असल्याने माझ्या मागे कोणीतरी उभं राहावं. सत्तेतील असोत किंवा विरोधातील… एकाने तरी माझ्या पाठी उभं राहून मी सांगत आहे तितक्या गोष्टींसाठी मुंबई पोलिसांकडे विनंती करावी,” असं त्याने म्हटलं आहे.

“प्रभाकर साईलचे फोन रेकॉर्ड काढा, सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील, जे आरोप करत आहे ते सर्व खोटे आहेत. यांनीच पैसे घेतले असून हा आणि त्याचे दोन भाऊ यात सहभागी आहेत,” असा आरोप किरण गोसावीने केला आहे.

आर्यन खान प्रकरणी अजून खुलासे होण्याची शक्यता

आर्यन खान प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यामुळे राज्यात सध्या खळबळ उडाली असून समीर वानखेडेंच्या कुटुंबीयांकडूनही स्पष्टीकरण दिलं जात आहे. दुसरीकडे एनसीबीचा साक्षीदार प्रभारक साईलने जबाब पलटला असून समीर वानखेडेंवर आरोप केले असून यात किरण गोसावीचाही समावेश आहे. प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा अंगरक्षक होता. किरण गोसावीला ताब्यात घेतल्यामुळे आर्यन खान प्रकरणी आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

अटक करण्यात आलेलं प्रकरण काय?

२०१८ मध्ये कसबा पेठ परिसरात राहणारा चिन्मय देशमुख हा नोकरीच्या शोधत होता. त्यावेळी त्याची किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांच्या सोबत ऑनलाईन ओळख झाली. या दोघांनी चिन्मयला मलेशियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावतो असे सांगितले. त्यावर त्याच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार चिन्मयने तीन लाख रुपये दिले. मात्र तरी देखील नोकरी बाबत काही सांगितले गेले नाही. त्यावर अखेर त्यांनी फसवणुक झाल्याची तक्रार दिली होती.

या तक्रारीच्या आधारे किरण गोसावी आणि शेरबानो कुरेशी यांना पोलिसांनी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याला दोघांनीही काही प्रतिसाद दिला नव्हता. त्यावर दोघा आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली. यानंतर किरण गोसावीची मैत्रीण शेरबानो कुरेशी हिला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. तसंच, किरण गोसावीविरोधात लुकआऊट नोटीस काढण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai drugs case kiran gosavi video before arrest ncb prabhakar sail sgy

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार
ताज्या बातम्या