पुणे : देशातील विदा केंद्रांमध्ये (डेटा सेंटर) मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यात मुंबईने आघाडी घेतली आहे. देशभरातील एकूण विदा केंद्र क्षमतेपैकी जवळपास निम्मी म्हणजेच ७६६ मेगावॉट एकट्या मुंबईत आहे. याचवेळी पुण्यातील विदा केंद्र क्षमता १४५ मेगावॉटवर पोहोचली आहे. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा म्हणून देशभरात विदा केंद्रांमध्ये जागतिक पातळीवरील कंपन्यांकडून गुंतवणुकीत वाढ होत आहे.
देशातील महानगरांमधील विदा केंद्रांचा अहवाल नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केला आहे. यानुसार, देशातील विदा केंद्र क्षमता २०१६ मध्ये २९६ मेगावॉट होती. ही क्षमता २०२५ च्या अखेरीस १.६ गिगावॉटवर पोहोचली. त्यात गेल्या पाच वर्षांत सरासरी वार्षिक वाढ ३० टक्के नोंदविण्यात आली. देशातील विदा केंद्र क्षमतेत २०२४ मध्ये ३६१.५ मेगावॉट तर २०२५ मध्ये ३७१.५ मेगावॉटची भर पडली आहे. जागतिक पातळीवर एआयचा स्वीकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यातून या तंत्रज्ञानासाठी पायाभूत सुविधा उभारणीसाठी विदा केंद्रांमध्ये गुंतवणूक वाढली आहे. आता विविध क्षेत्रात एआयचा प्रवेश झाला असून, आगामी काळात विदा केंद्रांच्या क्षमतेत यामुळे मोठी वाढ होणार आहे.
देशातील महानगरांमध्ये विदा केंद्र क्षमतेत मुंबई आघाडीवर आहे. देशातील एकूण क्षमतेत मुंबईचा वाटा ४७ टक्के आहे. मुंबईतील विदा केंद्र क्षमता २०२५ अखेरीस ७६६.६ मेगावॉट असून, ती २०२७ पर्यंत ८६६ मेगावॉटवर जाण्याचा अंदाज आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत इंटरनेट फायबर परिसंस्था भक्कम असल्याचा फायदा होत आहे. नवी मुंबई आणि चांदिवली या परिसरात प्रामुख्याने विदा केंद्रांची उभारणी होत आहे. पुण्यातील विदा केंद्र क्षमता २०१६ मध्ये ३१.४ मेगावॉट होती. ती २०२५ अखेरीस १४५.३ मेगावॉटपर्यंत पोहोचली आहे, असे अहवालात म्हटले आहे.
देशातील विदा केंद्र क्षमता
महानगर – २०२५ मधील क्षमता (मेगावॉट) – २०१६ मधील क्षमता (मेगावॉट) – वार्षिक वाढ (टक्क्यांत)
मुंबई – ७६६ – ९६.८ – २६
चेन्नई – १९१.५ – २७.४ – २४
नवी दिल्ली – १७४.५ – २२.३ – २६
बंगळुरू – १६९.५ – ७७.६ – ९
पुणे – १४५.३ – ३१.४ – १९
हैदराबाद – १५१.४ – ३७.१ – १७
कोलकता – २३.१ – ३.९ – २२
देशातील विदा केंद्र क्षमतेत मुंबईचा वाटा मोठा आहे. मुंबईची संपूर्ण देशाशी दळणवळणाच्या दृष्टीने जोडणी यात महत्वाची ठरत आहे. याचवेळी हैदराबादला एआय पायाभूत सुविधांसाठी पसंती मिळत आहे. देशात महानगरांसोबत इतर शहरांमध्ये विदा केंद्रांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येत असून, त्यात विशाखापट्टणम आणि जामनगरचा समावेश आहे. – विरल देसाई, वरिष्ठ कार्यकारी संचालक, नाइट फ्रँक इंडिया
