Mumbai Nanded Vande Bharat Express cancelled today: मुंबईहून नांदेडला जाणारी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस आज (२८ एप्रिल) रद्द करण्यात आली. काल पुणे रेल्वे स्थानकावरील सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा एक डबा रुळावरून घसरल्याने निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने निवेदनाद्वारे दिली.
नेमकं कारण काय?
सोमवारी (२७ एप्रिल) पहाचे चार वाजून पाच मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून सोलापूरकडे जाणारी वंदे-भारत एक्सप्रेस सुटली. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सोलापूर स्थानकावर गाडी पोहचणार होती. मात्र, सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर येत असताना गाडीच्या चौथ्या डब्याची एक ट्रॉली डायमंड क्रॉसिंगवर घसरली.
या दुर्घटनेमुळे रेल्वे रॅक उपलब्ध होऊ न शकल्याने आज (२८ एप्रिल) सकाळी मुंबईहून सुटणारी नांदेड वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करावी लागली, असे मध्य रेल्वे कडून कळविण्यात आले. पुणे रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आलेल्या यार्ड रिमॉडेलिंग कामांअंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक तीनचे काम प्रस्तावित आहे. या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा घसरला. आता या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
प्रवाशांचे हाल
काल सोलापूर ‘वंदे भारत’चा डबा घसरल्याने प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. काल रात्रीपासूनच प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवरून सुटणाऱ्या आणि प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले, प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यात आज (२८ एप्रिल) सकाळी नांदेड ‘वंदे भारत’ रद्द झाल्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. कामाच्या नियोजनानुसार या गाडीचे आरक्षण केलेल्या प्रवाशांनी मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. प्रवाशांना झालेल्या या त्रासाबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली असून, पुढील प्रवासाचे नियोजन आपापल्या सोयीने करण्याचे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
सहकार्याचे आवाहन
‘काल सोलापूर ‘वंदे भारत’चा डबा घसरला. या गाडीतील प्रवासी सुखरूप आहेत. मात्र, रेल्वेस्थानकावरील काही गाड्या या अपघातामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. पर्यायी व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, प्रवाशांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून करण्यात आले आहे.
