पुणे : लिफ्टमध्ये अडकून सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची सिंहगड रस्त्यावरील एका सोसायटीत ही घटना घडली. शिवांश शैलेश धूत (वय ७, रा. रिद्धी सिद्धी सोसायटी, निंबजनगर, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांश हा सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास सोसायटीच्या आवारात खेळत होता. खेळत असताना तो लिफ्ठमध्ये शिरला.
लिफ्टचे बटण त्याने दाबले. त्यानंतर लिफ्ठ दुसऱ्या मजल्यावर गेली. मात्र, दुसरा मजल्या येण्यापूर्वीच लिफ्ट अडकली हाेती. रहिवाशांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी अग्निशमन दलासह पोलिसांना ही माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला बाहेर काढले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
शिवांश याचा गुदमरुन मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृ्त्यू अशी नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
माणमधील तलाठ्याला लाच प्रकरणात पकडले
हिंजवडीतील माण गावातील तलाठ्याला २५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सायंकाळी पकडले. संतोष प्रल्हाद राणे (वय ४१) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. या प्रकरणी राणे याच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी राणे याला ताब्यात घेण्यात आले. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राणे हा हिंजवडी परिसरातील माण गावचा तलाठी आहे.
तक्रादार, त्यांची बहीण आणि भावांमधील हक्कसोड प्रमाणपत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी माणमधील तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ही नोंद करण्यासाठी तलाठी संतोष राणे यांनी तक्रारदाराकडे सव्वा लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने एक लाख रुपये राणे यला दिले होते. उर्वरित २५ हजार रुपये देण्याची मागणी राणे याने केली होती. तक्रारदाराने तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माणमधील तलाठी कार्यालय परिसरात मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सापळा लावला.
तक्रारदाराकडून लाच घेताना राणे याला पकडले. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त अधीक्षक अजित पाटील, अर्जनु भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर आणि पथकाने ही कारवाई केली. सहायक आयुक्त भारती मोरे तपास करत आहेत.
