पुणे :  मुंबई-बंगळुरू महामार्गावरील पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कोंडी सोडविण्याचे पाऊल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उचलले आहे. महामार्गावर पुनावळे ते ताथवडेदरम्यान तीन भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. पुनावळे, ताथवडे आणि वाकड या ठिकाणी हे भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहेत. यामुळे पिंपरी-चिंचवडसह हिंजवडी आयटी पार्क परिसरातील हजारो वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू असून, काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

पुनावळे, वाकड, किवळे, रावेत आणि आजूबाजूच्या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात कार्यरत असलेले कर्मचारी प्रामुख्याने या या भागातून प्रवास करतात. आता या नवीन भुयारी मार्गांमुळे त्यांचा प्रवास सुकर होणार आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकताच पुण्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला होता. त्यावेळी या प्रकल्पाबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली होती. मुंबई-बंगळुरू महामार्गावर तीन भुयारी मार्ग बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या कामाची निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाकड, पुनावळे आणि ताथवडे या तीन ठिकाणी हे भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. हे भुयारी मार्ग बॉक्स प्रकारचे असतील, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिली.

या नवीन भुयारी मार्गांमुळे वाहतूक कोंडीची दीर्घकालीन समस्या सुटण्यास मदत होणार आहे. महामार्ग आणि सेवा रस्त्यांवर कोंडी होणाऱ्या ठिकाणी हे भुयारी मार्ग प्रस्तावित आहेत. गेल्या काही वर्षांत वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने सध्या असलेले भुयारी मार्ग अपुरे पडत आहेत. त्यामुळे सेवा रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागतात. याचाच परिणाम महामार्गावरील  वाहतुकीवर होऊन कोंडी होते. आता नवीन भुयारी मार्गामुळे हा प्रश्न सुटेल. या कामासाठी सुमारे ७० ते ८० कोटी रुपये खर्च येणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

बॉक्स प्रकाराचा फायदा

भुयारी मार्गांची रचना ही बॉक्स प्रकारची असेल. या रचनेमुळे जलद गतीने भुयारी मार्गांचे बांधकाम पूर्म करते येते. याचबरोबर हा पद्धती पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी खर्चिक आहे. प्रिकास्ट काँक्रीटचे भाग वापरून भुयारी मार्ग बांधण्यात येतो. त्यात खोदकाम कमी करण्याची आवश्यकता भासते. बांधकामाचा वेळ कमी असल्याने काम सुरू असताना दीर्घकाळ वाहतूक विस्कळीत होत नाही.