पुणे : बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून देशातील महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. त्यांच्याकडून मुंबई, पुण्यासारख्या महानगरांना गुंतवणुकीसाठी पसंती मिळत आहे मात्र, या कंपन्यांकडून स्वतंत्र कार्यालयाऐवजी नवी पद्धती अवलंबली जात आहे. ही पद्धती आहे कार्यालयीन जागा सहकार्याची. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीत मुंबई आणि पुण्यात यात अनुक्रमे १३० टक्के व २७ टक्के वाढ झाली आहे.

देशातील महानगरांमध्ये कार्यालयीन जागा सहकार्याला वाढती पसंती मिळत आहे. यंदा पहिल्या सहामाहीत कार्यालयीन जागा सहकार्य चालकांनी १ लाख ९१ हजार ३०६ आसने भाड्याने दिली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ६८ टक्के वाढ झाली आहे. ‘कुशमॅन अँड वेकफिल्ड’ संस्थेने देशातील कार्यालयीन जागा सहकार्याचा या वर्षातील जानेवारी ते जून या सहामाहीचा अहवाल जाहीर केला आहे.

या अहवालानुसार, देशातील आठ महानगरांमध्ये कार्यालयीन जागा सहकार्याकडे कंपन्यांचा कल वाढू लागला आहे. एकूण कार्यालयीन जागांच्या व्यवहारात जागा सहकार्याचे प्रमाण आता २० टक्क्यांवर पोहोचले आहे. जागतिक क्षमता केंद्रांसाठी (जीसीसी) कार्यालयीन जागा सहकार्याला सर्वाधिक मागणी आहे. एकूण कार्यालयीन जागा सहकार्यात जीसीसीचा वाटा ४४ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत हा वाटा ३७ टक्के होता. जागतिक पातळीवरील कंपन्यांकडून जीसीसीसाठी भारताला पसंती दिली जात आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत देशात जीसीसीमध्ये गुंतवणूक वाढली आहे. त्याचे प्रतिबिंब आता कार्यालयीन जागांच्या मागणीतून दिसून येत आहे.

देशात कार्यालयीन जागा सहकार्यात बंगळुरू आघाडीवर आहे. यंदा पहिल्या सहामाहीत बंगळुरूमध्ये ५७ हजार ४८७ आसने भाड्याने देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ३१.८ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. देशातील एकूण व्यवहारात बंगळुरूचा वाटा ३० टक्के झाला आहे. मुंबईत यंदा पहिल्या सहामाहीत २५ हजार ८२० आसने भाड्याने देण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १३० टक्के वाढ झाली आहे. पुण्यात पहिल्या सहामाहीत २० हजार ९०० आसने भाड्याने देण्यात आली आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २७ टक्के वाढ झाली आहे. अहमदाबादमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आसने भाड्याने देण्यात सर्वाधिक ५७० टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जीसीसीचा वाटा जास्त

कार्यालयीन जागांच्या बाजारपेठेत जागा सहकार्याचे स्थान आणखी बळकट झाले आहे. कंपन्यांकडून प्रभावी, लवचीक आणि व्यवस्थापित अशा कार्यालयीन जागा सहकार्य सुविधांना पसंती दिली जात आहे. यात जागतिक क्षमता केंद्रांचा (जीसीसी) वाटा जास्त असून, त्यांच्याकडून कार्यालयीन जागा सहकार्याला प्राधान्य दिले जात आहे, असे कुशमॅन अँड वेकफिल्डच्या कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक रमिता अरोरा यांनी सांगितले.

कार्यालयीन जागा सहकार्य

महानगर – जानेवारी ते जून २०२५ मधील आसने – जानेवारी ते जून २०२६ मधील आसने – वाढ (टक्क्यांत)
मुंबई – ११,२२६ – २५,८२० – १३०
पुणे – १६,३५२ – २०,९०० – २७
बंगळुरू – ४३,६१६ – ५७,४८७ – ३१
हैदराबाद – १४,९३६ – ४०,४५१ – १७०
दिल्ली – ८,६९३ – २१,९७० – १५२
चेन्नई – १५,७३१ – १६,२९७ – ३.६
कोलकता – २,३३४ – ३,४५४ – ४८
अहमदाबाद – ७३५ – ४,९२७ – ५७०