पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ‘प्रोपलिन’ रासायनिक वायू वाहून नेणारा टँकर उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सुमारे ३२ तास कोलमडली होती. मात्र, स्फोटक वायूची गळती होत असल्याची बाब लक्षात घेऊन तातडीने अत्यंत चांगल्या पद्धतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आल्याबद्दल तज्ज्ञांकडून कौतुक करण्यात आले.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अडोशी बोगद्याजवळ रासायनिक वायू वाहून नेणारा टँकर उलटला. टँकरमधून अत्यंत स्फोटक असलेल्या प्रोपलिन या रासायनिक वायूची गळती होऊ लागल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बंद ठेवण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील प्रवास करणारे प्रवासी अडकून पडले होते. या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना गैरसोय, मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, स्फोटक वायूच्या गळतीमुळे दुर्घटना घडण्याचा धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करून हानी टाळण्यात आली.

प्रोपलिन वायूसंदर्भात ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ, कोलकाता येथील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू म्हणाले, रंगहीन असलेला प्रोपलिन हा वायू ज्वलनशील आहे. त्याला दुर्गंध असतो. या वायूची तीव्रता प्रचंड असल्याने गळती झाल्यास स्फोटही होऊ शकतो. या वायूतून प्रोपलिन ऑक्साईड, आयसोप्रोपिल अल्कोहोल ही रसायने तयार होतात. ही रसायने अनेक ठिकाणी वापरली जातात. ती धोकादायक नाहीत.

पेट्रोलियमपासून तयार केला जाणारा प्रोपलिन वायूचा वापर प्लॅस्टिक, वाहनोद्योग, बांधणी अशा वेगवेगळ्या उद्योगांत वापरला जातो. द्रव रुपात उणे ४७ अंशांवर साठवणूक केली जाते. तापमान वाढल्यास त्यातून कार्बन मोनॉक्साइड हा घातक वायू तयार होतो. प्रोपलिन वायुमुळे डोकेदुखी, मळमळ, हृदयाची धडधड वाढणे, श्वास घेण्यास अडचणी, मानसिक परिणाम होऊ शकतात.

प्रोपलिन हा वायू स्फोटक आहे. त्याला हायड्रोकार्बन म्हटले जाते. त्यातील काही घटक ज्वलनशील, तर काही स्फोटक आहेत. या वायूची साठवणूक दाबाखाली करण्यात येते. त्यात काही द्रव, तर काही वायू असतो. हा वायू झटकन पसरू शकतो. वायू वाहून नेणाऱ्या वाहनांचे चालक प्रशिक्षित असतात, अशी माहिती राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. आशिष लेले यांनी दिली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर घडलेल्या अपघातानंतर निर्माण झालेली परिस्थिती अथक प्रयत्न करून नियंत्रणात आणण्यात आली. तज्ज्ञांकडून अत्यंत चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली गेली. त्यामुळे अशी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता अधोरेखित झाली. स्फोटक वायू असताना तातडीने उपाययोजना केल्यामुळे वाहतूक कोंडीपेक्षा अधिक दुर्घटना घडली नाही ही कौतुकास्पद बाब आहे, याकडेही डॉ. लेले यांनी लक्ष वेधले.

‘लिक डिटेक्टर’सारख्या उपकरणांचा वापर आवश्यक

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर घडलेली घटना गंभीर स्वरुपाची आहे. अशा वायूंची वाहतूक करताना आत्यंतिक काळजी घेणे गरजेचे आहे. वायू गळतीच्या घटना रोखण्यासाठी लिक डिटेक्टरसारख्या उपकरणांचा वापर करणे आवश्यक असल्याचेही डॉ. नातू यांनी नमूद केले.