पुणे : मुंबई आणि पुण्यादरम्यानचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी उत्कृष्टतेचे प्रतीक ठरला आहे. याचवेळी तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अनोखे उदाहरण ठरत आहे. या प्रकल्पावर कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाधारित यंत्रणांची नजर आहे. त्यात स्काडा प्रणालीसह एआय आधारित देखरेख व नियंत्रण यंत्रणा, बुलेट कॅमेरे, पीटीझेड कॅमेऱ्यांसह एएनपीआर यंत्रणांचा समावेश आहे. यामुळे वाहनांचा अपघात, कोंडी, नियमभंग या गोष्टी तातडीने निदर्शनास येऊन त्यावर लगेच उपाययोजना शक्य होणार आहेत.

अनेक वर्षांपासून सद्याद्रीच्या पर्वतरांगांमधून होणारा मुंबई-पुणे प्रवास निसर्गरम्य असला तरी वेळखाऊ आणि अनिश्चित होता. महाराष्ट्र शासनाने १३.३ किलोमीटर ‘मिसिंग लिंक’ जोडण्याची संकल्पना मांडली. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीने प्रत्यक्षात आणला.

खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी टाळून हा मार्ग प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी करतो. यामुळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुंबई-पुणे द्रुगतती महामार्गावरील कोंडी सुटणार आहे. या प्रकल्पात विविध प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा १३.३ किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून त्यातील १०.६७ किलोमीटर भाग पाच मार्गिकांच्या दुहेरी बोगद्यांचा आहे. या बोगद्याची रुंदी प्रत्येकी २२.३३ मीटर आहे.

असे आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान

१) सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा अक्विजिशन सिस्टीम (स्काडा) : या यंत्रणेमुळे प्रत्यक्षात मिसिंग लिंकमधून सुरू असलेल्या वाहतुकीवर २४ तास नजर ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर या प्रकल्पातील हवेची गुणवत्ता आणि बोगद्यातील अत्याधुनिक यंत्रणांच्या कार्यावर देखरेख ठेवण्यात येईल.

२) एआय आधारित मॉनिटरिंग अँड कंट्रोल सिस्टीम्स : या यंत्रणेमुळे बोगद्यातील वाहतुकीची विदा संकलित केली जाणार आहे. या विदेच्या आधारे बोगद्यातील वाहतुकीच्या नियोजनाबाबत योग्य पद्धतीने निर्णय घेतले जाणार आहेत.

३) बुलेट, पीटीझेड कॅमेरे : मिसिंग लिंकवर दर १५० ते ३०० मीटर अंतरावर बुलेट कॅमेरे आणि पीटीझेड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे वाहनांच्या हालचालींवर प्रत्यक्ष लक्ष ठेवण्यात येणार आहे. याचबरोबर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिक्गनिशन (एएनपीआर) सिस्टीम्स बोगद्याच्या प्रत्येक प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे.

४) जेट व्हेंटिलेशन सिस्टीम्स : या यंत्रणेमुळे बोगद्यातील हवेच्या गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यात येईल. त्यात कार्बन मोनोऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड्सची पातळी तपासून बोगद्यातील हवा श्वसनयोग्य आहे की नाही, याची प्रत्यक्ष माहिती मिळेल.

५) अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा : आगीचा शोध घेणारी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आली असून, पाण्याचे फवारे बसविण्याच आले आहेत. दोन्ही बोगद्यांमध्ये प्रत्येक ३०० मीटरवर एकमेकांना छेद देणारा भाग बनविण्यात आला असून, त्याद्वारे आपत्कालीन प्रसंगी तातडीने मदत आणि सुटका शक्य होणार आहे.

६) संपर्क यंत्रणा : प्रत्येक ३०० मीटरवर एसओएस यंत्रणा बसविण्यात आली अशून, दर ५० मीटरवर इमर्जन्सी पुश बटण आहेत. तसेच, आपत्कालीन प्रसंगी वाहनचालकांना सूचना देण्यासाठी एफएम रेडिओ प्रसारण यंत्रणाही आहे.

विश्वविक्रमी प्रकल्प

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचा भाग म्हणून जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा तयार करून नवयुगाने कारकिर्दीतला दुसरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पटकावला आहे. नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक चिंत श्रीधर म्हणाले की, हा केवळ जागतिक विक्रम नाही, तर भारत काय साध्य करू शकतो याचे द्योतक आहे. सह्याद्रीतील कठीण बेसॉल्ट खडकांमध्ये सर्वात रुंद भूमिगत बोगदा उभारणे ही आमच्या जागतिक दर्जाच्या पायाभूत प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याच्या क्षमतेची साक्ष आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डकडून मिळालेली ही पावती आणि मान्यता आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.

या प्रकल्पाच्या उभारणीसाठी

  • ८५ लाख टनांहून अधिक खडक उत्खनन
  • ७,६०० टन स्टील वापर
  • १.१ लाख घनमीटर शॉटक्रीट
  • २.२ लाख घनमीटर PQC काँक्रीट
  • ९० लाख मनुष्यतास