पिंपरी :  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवले आहे.

‘खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी आणि वारंवार होणाऱ्या अपघातांवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून उभा राहिलेला ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प १ मे २०२६ रोजी कार्यान्वित झाला आहे. हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे. या प्रकल्पामुळे प्रवास सुमारे ६ किमीने कमी होणार असून, तब्बल अर्धा तास वेळ वाचणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उभारलेला जगातील सर्वात रुंद बोगदा आणि भारतातील सर्वात उंच पूल ही या प्रकल्पाची खास वैशिष्ट्ये आहेत’.

‘या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या संकल्पनेपासून ते अंमलबजावणीपर्यंत दिवंगत अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून निर्णायक भूमिका बजावली होती. विशेषतः २०२५–२६ च्या अर्थसंकल्पात त्यांनी निधीची तरतूद करून प्रकल्पाला गती दिली होती. त्यांच्या दूरदृष्टी आणि प्रशासनिक क्षमतेमुळेच प्रकल्पाच्या कामांना वेग मिळाला, असेही त्यांनी स्पष्ट केले. “सामान्य जनतेचा प्रवास सुरक्षित, वेगवान आणि सुलभ व्हावा, हीच अजितदादांची भूमिका होती. ‘मिसिंग लिंक’ हा त्यांच्या कार्याचा जिवंत पुरावा आहे. त्यामुळे या प्रकल्पाला त्यांचे नाव देणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल’, असे खैरनार यांनी म्हटले आहे.

मिसिंग लिंकचा प्रवास!

मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून दररोज सव्वा लाखांहून अधिक वाहने धावतात. यात भविष्यात आणखी वाढ होणार आहे. हा महामार्ग सध्या वाढत्या वाहन संख्येला सामावून घेण्यासाठी अपुरा पडत आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी १३.३ किमीचा मिसिंग लिंक प्रकल्प २०१९ मध्ये हाती घेण्यात आला. ६६९५ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प २०२१ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे या प्रकल्पास विलंब झाला. आता मात्र या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून शुक्रवारी, महाराष्ट्र दिनी या प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण पार पडले.