पुणे : राज्यातील सर्वात महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक असलेला मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प १ मेपासून वाहनचालकांसाठी खुला करण्यात आला. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुण्यादरम्यान प्रवासाचा अर्धा तास वेळ वाचत आहे. आता या प्रकल्पाच्या नामकरणाची मागणी समोर आली आहे. या प्रकल्पाला शिंग्रोबाचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरला असून, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने साकारलेला हा प्रकल्प मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख आर्थिक केंद्रांमधील वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित करीत आहे. सुमारे १३.३ किलोमीटर लांबीच्या या बाह्यवळण मार्गामुळे घाट विभागातील अवघड वळणे टाळली जात असून, प्रवासाचा कालावधी जवळपास ३० मिनिटांनी कमी होत आहे. या प्रकल्पाच्या नामकरणाची मागणी आता जोर धरू लागली आहे. शिंग्रोबा धनगराचे नाव या प्रकल्पाला द्यावे, अशी मागणी पुण्यातील उद्योग क्षेत्रातून होत आहे. या प्रकरणी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे मुख्याधिकारी दिलीप बटवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
शिंग्रोबा नेमका कोण?
बटवाल यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, नागरिकांना अनेक वेळा मुंबई-पुणे-मुंबई हा प्रवास जुन्या खंडाळा घाटातून करावा लागतो. या प्रवासात सुरक्षिततेच्या भावनेने लोक शिंग्रोबाच्या मंदिरात नाणे टाकून दर्शन घेतात. आपल्याला शिंग्रोबाची कथा माहित असेल अथवा नसेल, पण तरीही मी ती आपल्याला सांगतो आहे.
शिंग्रोबा धनगर या वाटाड्याने १९ व्या शतकात इंग्रजांना सोपा आणि सुरळीत मार्ग दाखवला. इंग्रजांनी त्यांना बक्षीस देण्याचा प्रस्ताव दिला असता, त्यांनी मला काही नको, पण तुम्ही आमचा देश सोडा, असे सांगितले. यामुळे इंग्रजांचा अहंकार डिवचला गेला आणि त्यांनी शिंग्रोबाला गोळ्या घालून मारले. यानंतर घाटात गाड्या बंद पडू लागल्या आणि अपघात होऊ लागले. त्यामुळे लोकांनी शिंग्रोबाच्या स्मरणार्थ तेथे एक मंदिर बांधले आणि सुरक्षित प्रवासासाठी तेथे नाणी टाकू लागले. त्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरील नवीन बोगद्याला शिंग्रोबा धनगराचे नाव द्यावे.
औद्योगिक विकासाला गती
मिसिंग लिंक हा प्रकल्प राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासाला नवे बळ देणार असल्याचे मत उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात आले आहे. या सुधारित दळणवळण व्यवस्थेमुळे उद्योग क्षेत्राला मोठा फायदा होत आहे. जलद वाहतूक, कमी मालवाहतूक खर्च आणि मालाच्या जलद हालचालीमुळे पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम होण्यास मदत होत आहे. तसेच कामगारांची ये-जा सुलभ होऊन उद्योगांच्या कार्यक्षमतेत वाढ होत आहे.
