पुणे : मुंबई आणि पुण्यादरम्यानचा ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प सुरु झाला असून, त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचू लागला आहे. परंतु, आता मिसिंग लिंकवर सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटनानंतर दोनच दिवसांत तो सेल्फी पॉइंट बनला असून अनेक वाहनचालक मिसिंग लिंकवर थांबून सेल्फी घेताना आणि रील्स बनवताना दिसत आहेत. यामुळे अपघात होण्याचा गंभीर धोका निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कारवाईचे पाऊल उचलले आहे.

मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत उत्सुकता आणि आकर्षण वाहनचालकांमध्ये आहे यामुळे हा प्रकल्प वाहतुकीस खुला झाल्यानंतर वाहनचालकांनी प्रकल्पावर धाव घेतली. मिसिंग लिंकवर दुतर्फा मोटारी थांबल्याचे चित्र दिसू लागले. वाहनचालक धोकादायकरित्या सेल्फी काढताना आणि रील्स बनवताना आढळून आले. यामुळे मिसिंग लिंकवरील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर उपाय म्हणून ‘एमएसआरडीसी’ने मिसिंग लिंकवर वाहन थांबवणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याचे पाऊल उचलले आहे. यासाठी कृत्रिम प्रज्ञा आधारित तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे.

वेगमर्यादा उल्लंघन नको

मिसिंग लिंकवर सध्या वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार मोटारीसाठी प्रतितास १०० किलोमीटर आणि बससाठी प्रतितास ८० किलोमीटर ही वेगमर्यादा आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. सध्या मिसिंग लिंकवरून मोटारी आणि बसना परवानगी असून जड वाहनांना परवानगी नाही. हे नियम ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असून, त्यानंतर जड वाहनांबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे ‘एमएसआरडीसी’ने स्पष्ट केले आहे.

अर्धा तास वेळ वाचणार

अनेक वर्षांपासून सद्याद्रीच्या पर्वतरांगांमधून होणारा मुंबई-पुणे प्रवास निसर्गरम्य असला तरी वेळखाऊ आणि अनिश्चित होता. महाराष्ट्र शासनाने १३.३ किलोमीटर ‘मिसिंग लिंक’ जोडण्याची संकल्पना मांडली. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनीने प्रत्यक्षात आणला.

खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी टाळून हा मार्ग प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी करतो. यामुळे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मुंबई-पुणे द्रुगतती महामार्गावरील कोंडी सुटणार आहे. या प्रकल्पात विविध प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हा १३.३ किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून त्यातील १०.६७ किलोमीटर भाग पाच मार्गिकांच्या दुहेरी बोगद्यांचा आहे. या बोगद्याची रुंदी प्रत्येकी २२.३३ मीटर आहे.