Mumbai Pune Expressway Missing Link Accident: पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकवरील बोगद्यात झालेल्या भीषण अपघातात पिंपरी चिंचवडमधील युवा काँग्रेस कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या दिशेने जाणारी भरधाव कार मिनी ट्रकला धडकल्याने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे. अपघातात युवा काँग्रेस नेत्याचा मृत्यू झाला असून, सहाजण जखमी झाले आहेत.

पिंपरी चिंचवडमधील युवा नेत्याचा मृत्यू

तुषार भूमकर (३५) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तुषार काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते होते. त्यांच्या पत्नी नुकत्याच झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार होत्या. महामार्ग सुरक्षा गस्ती पथकाचे अधीक्षक (पुणे परिक्षेत्र) शिवाजी पवार यांनी या अपघाताबाबात इंडियन एक्सप्रेसला माहिती देताना, पहाटे सुमारे १.२० वाजता एसयूव्ही कारने ट्रकला मागून धडक दिली, असे सांगितले. पोलिसांनी कार चालकाला बेदरकारपणे वाहन चालविल्याबद्दल अटक केली आहे.

पोलिसांनी दिली अपघाताची माहिती

“तुषार भूमकर चालकाच्या शेजारील सीटवर बसले होते. अपघातानंतर तुषार यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमध्ये मागच्या सीटवर असणारे चौघे, कार चालक आणि मिनी टेम्पोतील क्लिनर असे सहाजण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे. कार खूप वेगात असल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसते, पुढील तपास सुरु आहे”, असे माहिती लोणावळा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सचिन पाटील यांनी इंडियन एक्सप्रेसला दिली आहे.

अपघाताचा व्हिडीओ समोर

मिसिंग लिंकवर झालेल्या या अपघाताचा काळजाचा धरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. यात मिसिंग लिंकच्या बोगद्यातून भरधाव वेगात येणार कार दिसत आहे. भरधाव कारने समोर असलेल्या मिनी ट्रकला जोराची धडक दिली. या मिनी ट्रक देखील जोरात पुढे ढकलला गेल्याचे दिसत आहे. तर, कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, या अपघातामुळे पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.