पुणे/मुंबई/अलिबाग : मुंबई आणि पुणे या दोन महानगरांना जोडणारा देशातल्या पहिल्या सहा पदरी द्रुतगती मार्गावर ज्वलनशील रसायन घेऊन जाणारा टँकर मंगळवारी सायंकाळी उलटल्याने हा मार्ग ३२ तास ठप्प होता. रात्रीचे अंधारलेले रस्ते, तासन््तास न हलणारी वाहने, रडणारी मुले, असहाय्य महिला आणि पाण्याच्या एका बाटलीसाठी होणारी फरपट अशा परिस्थितीत हजारो प्रवाशांचे आयुष्य अक्षरशः थांबले होते. इतक्या महत्त्वाच्या महामार्गावर आपत्कालीन व्यवस्थापन इतके तोकडे का ठरले, हा प्रश्न आता विचारला जात आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

ज्वलनशील असे प्रोपोलीन रसायन घेऊन जाणारा टँकर खंडाळ्याजवळ आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी पाच वाजता उलटला. त्यानंतर प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र एकच मार्गिका सुरु असल्याने बुधवारीही द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. गॅसला आग लागू नये यासाठी टँकरवर सतत पाण्याचा मारा करण्यात आला.

कोंडीत बत्तीसहून अधिक तास अडकलेल्या प्रवाशांचे हाल झाले. अपघातस्थळाजवळ रात्रभर वाहने उभी राहिली. प्रवाशांना अन्न, पाणी किंवा शौचालयाची सुविधा नव्हती. सुमारे २२ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गॅस गळती रोखण्यात यंत्रणांना यश आले. त्यानंतर उर्वरित गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरून अपघातग्रस्त टँकर हटवण्यात आला आणि एका मार्गिकेवर वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे घाट परिसरात वाहतूक संथ सुरू होती. छोटी वाहने जुन्या महामार्गावर वळवून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, या मार्गावरही अवजड वाहने आल्याने लोणावळा–खोपोली आणि खोपोली–खालापूर पट्ट्यात बुधवारी कोंडी झाली.

अपघातामुळे टँकरला तीन ठिकाणी गळती लागली होती. दोन ठिकाणची गळती थांबवण्यात यश आले; मात्र तिसरी गळती नियंत्रणात येत नव्हती. अखेर दुसरा टँकर मागवून अपघातग्रस्त टँकर रिकामा करण्यात आला. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत सक्षम यंत्रणा उपलब्ध राहावी, यासाठी उपाययोजना केल्या जातील. – किशन जावळे, जिल्हाधिकारी, रायगड</strong>

प्रवाशांचे हाल

अनेक प्रवासी रात्रभर द्रुतगती मार्गावरच अडकल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. पिण्याच्या पाण्याचा, अन्नाचा तुटवडा भासल्याने अनेक जणांना गाडीतच उपाशी बसून राहावे लागले. राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या एका वाहकाने वृत्तसंस्थेला अनुभव सांगितला. त्यांचे वाहन अपघातस्थळाजवळ सहा तासांहून अधिक काळ उभे होते. प्रवाशांना अन्न, पाणी आणि शौचालयाची सुविधा नव्हती. वाहनचालकांनीही समाजमाध्यमावर संताप व्यक्त केला. महामार्गाचे वर्णन पार्किंग लॉट असे केले.