MSRDC Khalapur Toll Free Decision: यशवंतराव चव्हाण पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर रासायनिक वायू वाहून नेणारा टँकर उलटून सुमारे ४५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असतानाही खालापूर आणि टोलनाक्यांवरून पैसे घेऊन वाहने सोडली जात होती. आधीच कोंडीचा सामना करून त्रस्त झालेल्या वाहनचालकांनी संताप व्यक्त केल्यानंतर अखेर दुपारनंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) टोलमुक्त प्रवेश आणि निर्गमन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
‘एमएसआरडीसी’च्या प्राथमिक अहवालानुसार, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजता पुण्याहून मुंबईकडे रासायनिक वायू वाहून नेहणारा टँकर आडोशी बोगद्याजवळ (बोरघाट विभागात) उलटला. मुंबईपासून सुमारे ९५ किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. बुधवारी वाहनांची रांग मुंबईच्या दिशेने जवळपास ४५ किलोमीटर लांबपर्यंत पोहचली. मात्र, तरीही खालापूर टोलनाक्यावरून वाहनचालकांकडून टोलवसुली सुरू होती. महामार्गावरच अडकून पडलेल्या वाहनचालकांचा रोष वाढून त्यांनी समाजमाध्यमावर संताप व्यक्त करून परिस्थितीचे वास्तव मांडले. अखेर एमएसआरडीसीने आयआरबी कंपनीच्या खालापूर टोलनाक्यावरील वाहतूक टोलमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे सांगण्यात आले.
खालापूर टोलनाक्यावरून वाहनचालकांकडून बिनधास्त पैसे घेऊन वाहने सोडली गेली. पुढील मार्गअद्याप खुला झाला नसल्याचे ठाऊक असताना टोल नाक्यावरून टोलभरून वाहने मार्गस्थ केली गेल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती वाहनचालक संदेश कोतमिरे यांनी दिली. जवळपास चौदा तासांपेक्षा अधिक कालावधी अनेक वाहनचालक जागेवरच उपाशी, विना पाण्याविना अडकून पडले होते. प्रशासनातील परस्पर समन्वयाच्या अभावामुळे वाहनांच्या रांगा लागल्याचा आरोपही कोतमिरे यांनी केला.
महामार्गावरील वाहतूक कोंडी झाल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांसाठी मावळ प्रांत कार्यालयाकडून तातडीने तलाठी आणि मंडल स्तरावर मदतीच्या सूचना देण्या आल्या. अडकलेल्या प्रवाशांसाठी चहा, पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटे पुरविण्यात आले. खोपोली नगरपरिषदेकडूनही याबाबत कार्यवाही करून प्रवाशांना मदत पुरवून दिलासा देण्याची कार्यवारी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आले महामार्ग पोलीस आणि अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले. – सुरेंद्र नवले, प्रांत अधिकारी, मावळ
महामार्गावरील अपघातग्रस्त टँकरमधील वायू रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या टँकरमध्ये स्थानांतरित करण्यात येत होता. त्यानंतर तज्ज्ञांनी सुचविलेल्या कार्यपद्धतीनुसार टँकर घटनास्थळावरून हटविण्याची कार्यवारी करण्यात येणार आहे. मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्ववत होईपर्यंत वाहनांकडून टोल वसुली करू नये, असे आदेश मुंबई विभागाकडून देण्यात आले आहेत. – राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, एमएसआरडीसी

