पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी, तसेच वाहतूक संघटना, उद्योजक, व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सामान्य प्रवाशांबरोबर व्यवसायांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत असून, या मार्गावर तातडीने पायाभूत सुविधांची आणि सुरक्षित पर्यायी आपत्कालीन व्यवस्था तयार करण्याची मागणी जड-अवजड, प्रवासी वाहतूक संघटना, उद्योजक, व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. या बाबत व्यावसायिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मंगळवारी (३ फेब्रुवारी) रासायनिक वायूचा टँकर आडोशी (बोरघाट) बोगद्याजवळ पलटी झाला. मात्र, त्यानंतर महामार्गावर पुणे-मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गांवर सुमारे ३० ते ४० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रामुख्याने एसटी महामंडळासह खासगी बस, उद्योगांचे स्वतंत्र सुटे भाग किंवा व्यावसायिक उपकरणे, कच्च्या मालाची वाहतूक करणारी औद्योगिक अवजड वाहने, कृषी क्षेत्रातील फळ-भाजीपाला, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे टँकर, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजनचे टँकर अडकून पडले. सुमारे ३२ तास एकाच ठिकाणी ही वाहने अडकून पडल्याने सर्वच क्षेत्रांवर प्रचंड परिणाम पडला. मात्र, नाशवंत मालही खराब झाल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले असल्याच्या घटना समोर आल्या.
महामार्गावरील मार्गिकांबाबत कुठलाच आक्षेप नाही, परंतु, वाहनधारकांना मार्गिका बदलाबाबत शिस्त आणि वेगमर्यादेबाबत बेशिस्तपणा दिसून येत आहे. त्यासाठी महामार्ग पोलिसांची सुसज्ज यंत्रणा, तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास होणे आवश्यक आहे. अडकून पडलेल्या वाहनचालक प्रवाशांसाठी पायाभूत सुविधांची कुठलीच तरतूद नसल्याने प्रचंड उणिवा असल्याचे जाणवते. या पर्यायी व्यवस्था असत्या, तर अशा भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते. त्यामुळे या पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेसाठी यंत्रणांना आदेश द्यावेत, असे व्यावसायिक कपिल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सुट्यांच्या काळात, किरकोळ अपघात झाल्यावरही वाहतूककोंडी होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. मात्र, यामध्ये सर्वाधिक दोषी अवजड वाहनधारकांनाच धरले जाते. प्रत्यक्षात अवजड वाहनांना सर्वांत कमी वेगमर्यादेचे बंधन आहे. त्यातच गाडीत माल असल्याने वाहने संथ चालत असली, तरी लहान, प्रवासी वाहने वेगाने येऊन पुढे येत अपघातास कारणीभूत ठरतात किंवा अडचणी निर्माण करतात. दीर्घकालीन वाहतूककोंडी झाल्यास, विलंब, इंधनाचा वाढीव खर्च, मालाचे होणारे नुकसान ही संपूर्ण भरपाई द्यावी लागते. त्यामुळे पायाभूत सुविधांबरोबर पर्यायी शीघ्र कृती दलासारख्या व्यवस्था, यंत्रणा महामार्गांवर सुसज्ज ठेवाव्यात. – बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटना
चाकण-शिक्रापूर येथील औद्योगिक कंपन्यांमधून प्रक्रिया करून पाठविण्यात येणारा माल किंवा इतर ठिकाणांवरून मागविण्यात आलेला कच्चा माल वेळेवर पोहोचला नाही, तर दिवसभरात प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागते. महामार्गावर होणारी वाहतूककोंडी, रस्त्यांची दुरवस्था यामुळे आर्थिक संकट गडद होत आहे. रस्त्यात अडकून पडलेल्या वाहनांना पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. – अभिषेक पाटील, व्यावसायिक, चाकण
दौंड येथून मुंबईच्या दिशेने शेतमाल पाठवत असताना टँकर उलटल्याच्या दुर्घटनेमुळे दीड दिवस वाहतूककोंडी झाली. मात्र, याचा फटका शेतमालाला बसला. नाशवंत माल असल्याने भाज्या सडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याबरोबर वाहन खर्च, इंधन, टोल याचा आर्थिक फटका बसला. अशा घटना घडल्यावर तत्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. – कैलास दुरुंदे, शेतकरी, दौंड
महामार्गावर आपत्कालीन परिस्थितीत प्रवासी, हलक्या वाहनांना माघारी किंवा पुढे जाण्याचा मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच, मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर आपत्कालीन यंत्रणा, हेलिपॅडसारख्या सुविधा निर्माण करण्यात याव्यात, जेणेकरून या यंत्रणा तातडीने घटनास्थळी पोहोचू शकेल. संकटग्रस्त, जखमी, आजारी व्यक्तीला तातडीने सेवा मिळेल. – डाॅ. सुधीर मेहता, उद्योजक आणि माजी अध्यक्ष, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स
