पुण्यामध्ये विद्यानंद बापट यांनी सण-उत्सवांमधील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा ठामपणे मांडल्यानंतर राज्यातील अनेक शहरांमध्ये यासंदर्भात भूमिका घेतली जात आहे. नागपूरपाठोपाठ नवी मुंबई, सांगली या शहरांमध्ये डीजेबंदीचा निर्णय घेण्यात आला. मुंबईत डीजेच्या वापरावर २०१५पासून बंदी असून उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिला.

मुंबई : पुण्यात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डीजेच्या वापरावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेशोत्सव मंडळांनीच आवाजाची पातळी मर्यादित ठेवण्याचे मान्य केले आहे. अन्यथा पोलिसांकडून कारवाई केली जाईल, याची त्यांना कल्पना आहे. मुंबईत डीजेच्या वापरावर २०१५ पासून बंदी आहे, असे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी शुक्रवारी सांगितले.

पत्रकारांशी संवाद साधताना भारती म्हणाले, ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक बोलाविण्यात आली होती. उत्सव काळात आवाजाची पातळी मर्यादित ठेवण्यात यावी. अन्यथा पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे या मंडळांना बजावण्यात आले. मंडळांनीही आवाजाची विशिष्ट पातळी राखण्याबाबत आश्वासन दिले आहे.

’नवी मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजे आणि लेझर लाइटचा वापर टाळावा. नियमांचे उल्लंघन करणार्‍या मंडळावर आणि डीजे मालकांवर कारवाई करण्यात येईल, असा पोलीस आयुक्तांचा इशारा.

’सांगली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीमध्ये ‘डीजे’, ‘लेझर लाइट’वर बंदी घालण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश.

’सातारा :  गणेशोत्सवासह वर्षभर विविध सण-उत्सव आणि जयंती सोहळ्यात ‘डीजे’, ‘लेझर लाइट’वर बंदी घालण्याची मागणी ज्येष्ठ नागरिकांनी केली. 

’नागपूर : डीजेबंदीवरून भाजपच्या दोन नेत्यांमध्ये मतभेद. माजी आमदार संदीप जोशी यांनी डीजेबंदी कायमस्वरूपी करावी, अशी मागणी केली, तर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी डीजेबंदीच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी मागणी केली.

’पुणे : मिरवणुकीत उच्च क्षमतेची ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरल्याने एका मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच ध्वनिक्षेपक यंत्रणा पुरविणारा व्यावसायिक यांना शिक्षा.

आपले सण आणि उत्सव साजरे करताना ते जास्तीत जास्त परंपरा पाळून साजरे व्हावेत. डीजेसारख्या काही पद्धती वर्षानुवर्षे सुरू आहेत. डीजेमुळे लोकांना खूप त्रास होतो. त्यांचे स्तोम लोकसहभागाने कमी करावे लागणार आहे. तोपर्यंत पारंपरिक पद्धतीने आणि कमीत कमी ध्वनिप्रदूषण करून गणेशोत्सव साजरा करावा.                – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री