पुणे : मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील दरी पूल ते नवले पूल मार्गादरम्यान असणाऱ्या धोकादायक ठिकाणांवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. कमकुवत झालेल्या भागांच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. तसेच, संपूर्ण डोंगराला लोखंडी जाळी बसविण्यात येणार असल्याचे ‘एनएचएआय’कडून स्पष्ट करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ दरम्यान कात्रज बोगदा, नवले पूल, दरी पुलादरम्यान सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणांकडून प्रतिबंधात्मक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. दरी पूल ते नवले पूल यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. कडेकपाऱ्यांमधून दगड माती, चिखल रस्त्यावर कोसळून वाहतूक ठप्प होत असल्याच्या किंवा अपघात होण्याच्या घटना घडतात. प्रामुख्याने पावसाळ्यात हा धोका वाढतो. या भागांत वाहने घसरण्याचे प्रकारही घडले आहेत.
‘एनएचएआय’ने दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत डोंगराळ भागांची पुन्हा एकदा पाहणी केली. भेगा, चिरा पडलेले दगड, माती-पाणी वाहण्याच्या जागा, खडकांचा कमकुवत झालेला भाग असे सारे ‘ब्लॅक स्पाॅट’ निश्चित करून या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘काँक्रीट शीट’, ‘फाॅर्मवर्क ’(मोल्डिंग), ‘शाॅटक्रीट’, ‘साॅईल नेलिंग’, ‘स्टोन पिचिंग’ आदी कामे केली जात आहे. जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडणार नाही, वाहतूक सुरळीत सुरू राहील, अशी माहिती ‘एनएचएआय’कडून देण्यात आली.
पावसाळ्यात कडेकपाऱ्यांमध्ये पाणी जाऊन इतर ठिकाणी भेगा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी दगडी बाजूंना सुरक्षा कवच म्हणून लोखंडी जाळी बसविण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
‘महिनाभर काम – काळजी घ्यावी’
दरड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत ‘एनएचएआय’च्या सुरक्षा विभागाकडून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दीर्घकालीन उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. साधारणत: महिनाभर हे काम सुरू राहील. काम करताना कर्मचाऱ्यांची वाहने, उपकरणे असल्याने थोड्या अडचणी येऊ शकतात. मात्र, वाहतूक सुरळीत राहील या दृष्टीने काम सुरू ठेवण्यात येत असून, वाहनचालकांनी सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन ‘एनएचएआय’कडून करण्यात आले आहे.
पावसाळ्यात नवले पूल आणि दरीपुलादरम्यान रस्त्यावर पाणी येणे, दगड पडणे अशा घटना घडत आहेत. अनेकदा वाहने घसरणे, कोंडी निर्माण होणे, अपघात घडले असून, डोंगरी भागाच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे दीर्घकालीन उपाययोजनेेंतर्गत रस्त्यावर छोटासा दगडही कोसळणार नाही, अशी काळजी घेऊन काम करण्यात येत आहे. – संजय कदम, प्रकल्प संचालक, एनएचएआय

