पुणे : देशातील घरांच्या किमतीत वाढ सुरू असून, सरासरी किमती पहिल्यांदाच प्रतिचौरस फूट १० हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत घरांच्या किमतीत मुंबईत २० टक्के, तर पुण्यात ११ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. घरांच्या किमतीत वाढ होत असताना नवीन घरांचा पुरवठा आणि विक्रीत मात्र घट होताना दिसून आली आहे.
‘प्रॉपटायगर’ने देशातील आठ प्रमुख शहरांतील स्थावर मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, यंदा जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशात घरांच्या सरासरी किमती प्रतिचौरस फूट १० हजार ५० रुपयांवर गेल्या आहेत. मुंबईत घरांच्या सरासरी किमती सर्वाधिक असून, त्या १५ हजार १२० रुपये प्रतिचौरस फूट आहेत. त्या खालोखाल बंगळुरू (९ हजार ७८५ रुपये), दिल्ली (९ हजार ५३४ रुपये), हैदराबाद (८ हजार २४० रुपये), पुणे (७ हजार ९५७ रुपये), कोलकता (६ हजार २२२ रुपये) आणि अहमदाबाद (४ हजार ९४९ रुपये) असा क्रम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत घरांच्या सरासरी किमतीत सर्वाधिक २४ टक्के वाढ बंगळुरूत झाली असून, त्या खालोखाल मुंबईत २० टक्के, दिल्ली १७.६ टक्के, पुणे ११.९ टक्के, हैदराबाद ११.२ टक्के, अहमदाबाद ८.३ टक्के, कोलकता ६.६ टक्के आणि चेन्नईत ३.४ टक्के अशी वाढ आहे.
यंदा पहिल्या तिमाहीत प्रमुख महानगरांत ९५ हजार ९७३ घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत ही विक्री ९८ हजार ९५ होती. त्या तुलनेत यंदा विक्रीत २.२ टक्के घट झाली आहे. पहिल्या तिमाहीत मुंबईत सर्वाधिक २६ हजार ११६ घरांची विक्री झाली. त्या खालोखाल बंगळुरू १५ हजार ६०३, पुणे १३ हजार ५६५, हैदराबाद १३ हजार २९७, दिल्ली ९ हजार ४४७, अहमदाबाद ८ हजार २२१, चेन्नई ६ हजार ८४१ आणि कोलकतामध्ये २ हजार ८८३ घरांची विक्री झाली. यंदा पहिल्या तिमाहीत प्रमुख महानगरांतील नवीन घरांचा पुरवठा ९३ हजार ६५ आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो ९३ हजार १४४ होता. त्यात आता ०.१ टक्का घट नोंदविण्यात आल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
मुंबई, पुण्यात विक्रीत घट
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत मुंबईत घरांच्या विक्रीत १४.९ टक्के, तर नवीन पुरवठ्यात १३.२ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. याच वेळी पुण्यात घरांच्या विक्रीत २१.३ टक्के घट, तर नवीन पुरवठ्यात १.५ टक्के वाढ झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
देशातील घरांच्या विक्रीत प्रमुख शहरांचा हिस्सा (टक्क्यांत)
मुंबई – २७.२
बंगळुरू – १६.३
पुणे – १४.१
हैदराबाद – ११.२
दिल्ली – ९.९
अहमदाबाद – ८.६
चेन्नई – ७.१
कोलकता – ३.०
