मुंबईहून पुण्याकडे येत असलेल्या इंटरसिटी एक्सप्रेसच्या एका डब्याच्या खालच्या बाजूने धूर निघत असल्याने प्रवाशांमध्ये काही काळ घबराट निर्माण झाली होती. सकाळी साडेनऊच्या सुमारास बेगडेवाडी स्थानकाजवळ गाडी थांबवून तातडीने उपाय-योजना करण्यात आल्या. त्यानंतर ही गाडी पुणे स्थानकाकडे रवाना करण्यात आली. गेल्या आठवड्यातही याच गाडीबाबत असाच प्रकार घडला होता.
इंटरसिटी एक्सप्रेस मुंबई येथून आज सकाळी साडेसहा वाजता सुटली. बेगडेवाडी स्थानकाजवळ गाडी येत असताना इंजिनपासूनच्या चौथ्या डब्याच्या खालून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. त्यामुळे तातडीने गाडी बेगडेवाडी स्थानकावर थांबविण्यात आली. रेल्वेच्या पथकाने डब्याची पहाणी करून तातडीने उपाय-योजना केल्या. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर गाडी पुण्याकडे रवाना करण्यात आली.




गेल्या आठवड्यातही याच गाडीबाबत अशीच घटना घडली होती. पुण्यावरून मुंबईकडे जाताना कर्जतजवळ डब्याखालून धूर येण्याचा प्रकार घडला होता. आज घडलेला प्रकार नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, ब्रेकच्या घर्षणाने हा धूर निघाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. रेल्वे प्रशासनाने सर्व गाड्यांबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी केली आहे.