पिंपरी : मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या बोगद्यात पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव मोटारीची टेम्पोला धडक बसून झालेल्या अपघातात वाकड येथील एका बांधकाम व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. सहाजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्री सव्वाएकच्या सुमारास झाला.
तुषार वामन भूमकर (वय- ३५, रा. वाकड) असे अपघातात मृत्यू झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. जखमींमध्ये मोटारीमधील प्रसाद विनोदे, पंकज पाटील, प्रदीप भुसारे, अमित भाटी (सर्व रा. वाकड, पिंपरी चिंचवड), टेम्पोचालक रामभाऊ मुंडबे (रा. धाराशिव), मदतनीस कुलदीप पवार (वय ३१, रा. औसा, लातूर) यांचा समावेश आहे. याबाबत पवार यांनी लाेणावळा शहर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमकर हे काही कामानिमित्त मित्रांबरोबर मिसिंग लिंकवरून मुंबईकडे जात होते. शुक्रवारी मध्यरात्री सव्वाएक वाजण्याच्या सुमारास मिसिंग लिंकच्या बोगद्यातून भरधाव वेगात जाणाऱ्या मोटारीवरील चालक अमितचे नियंत्रण सुटले. मोटार समोरील टेम्पोला मागून जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, मोटारीचा चुराडा झाला आणि टेम्पो मार्गावर उलटला. या भीषण धडकेत तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर मोटारमधील चारजण जखमी झाले असून, यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सचिन पाटील, पोलीस उपनिरीक्षक चमन शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. रस्ते विकास महामंडळाच्या यंत्रणेच्या मदतीने जखमींना बाहेर काढून उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात हलविले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून विस्कळित झालेली वाहतूक सुरळीत चालू केली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदेश चंदनशिव हे करीत आहेत.
