पुणे : जगभरातील कंपन्यांकडून भारतात गुंतवणुकीला पसंती दिली जात आहे. यामुळे देशभरात कार्यालयीन जागांच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. यंदा पहिल्या सहामाहीचा विचार करता वेगळेच चित्र समोर येऊ लागले आहे. ही वाढ आता मुंबई आणि पुण्यात कमी होऊन दक्षिणेतील शहरांमध्ये जास्त होऊ लागली आहे. यामुळे देशातील कार्यालयीन जागांच्या एकूण व्यवहारात मुंबई आणि पुण्याचा वाटा कमी होऊन बंगळुरू आणि हैदराबादचा वाटा ४९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
अनारॉक रिसर्चने देशातील महानगरांतील जानेवारी ते जून या सहामाहीतील कार्यालयीन जागांच्या बाजारपेठेचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालानुसार, देशात पहिल्या सहामाहीत कार्यालयीन जागांचे भाडेतत्वावरील एकूण व्यवहार ४ कोटी २६ लाख चौरस फूट झाले. गेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत कार्यालयीन जागांचे एकूण व्यवहार ३ कोटी ८२ लाख चौरस फूट होते. जागतिक सुविधा केंद्रांसाठी (जीसीसी) बहुराष्ट्रीय कंपन्यांडून भारताला पसंती मिळत आहे. यामुळे यंदा पहिल्या सहामाहीत देशातील सात महानगरांमध्ये झालेल्या कार्यालयीन जागांच्या व्यवहारात जीसीसीचे प्रमाण ४५ टक्क्यांवर पोहोचले आहे. जीसीसीसाठीचे व्यवहार १ कोटी ९२ लाख चौरस फूट आहेत.
यंदा पहिल्या सहामाहीत कार्यालयीन जागांच्या मागणीत मुंबई आणि पुण्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे ४ व ३३ टक्के घट झाली आहे. मुंबईत पहिल्या सहामाहीत ४३ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत ४५ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले होते. पुण्यात पहिल्या सहामाहीत २५.५ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षी पहिल्या सहामाहीत ३८ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले होते.
बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून संशोधन व विकास, कृत्रिम प्रज्ञा, वित्तीय, सायबरसुरक्षा आणि डिजिटल कामकाज यासाठी देशात जीसीसी सुरू केली जात आहेत. जीसीसी व्यवहारांमध्ये दक्षिणेतील महानगरे आघाडीवर आहेत. बंगळुरूमध्ये पहिल्या सहामाहीत कार्यालयीन जागांचे १ कोटी ८ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले असून, त्यात जीसीसीचा वाटा ७० टक्के आहे. हैदराबादमध्ये कार्यालयीन जागांचे व्यवहार ६४ लाख चौरस फूट झाले असून, त्यात जीसीसीचा वाटा ४८ टक्के आहे. चेन्नईमध्ये कार्यालयीन जागांचे ३२ लाख चौरस फुटांचे व्यवहार झाले असून, त्यात जीसीसीचा वाटा ५५ टक्के आहे, असे अहवालात म्हटले आहे.
कार्यालयीन भाड्यात ९ टक्के वाढ
देशभरात कार्यालयीन जागांच्या भाड्यात वाढ होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीत भाड्यात ९ टक्के वाढ झाली आहे. कार्यालयीन जागांचे दरमहा भाडे प्रतिचौरसफूट ८८ रुपयांवरून ९६ रुपयांवर पोहोचले आहे. बंगळुरू, दिल्ली आणि हैदराबादमध्ये कार्यालयीन जागांच्या भाड्यातील वाढ अधिक असून, ती १० टक्के आहे. मागणी आणि पुरवठा संतुलित असल्याने भाड्यातील वाढ कायम आहे.
