पुणे : मागील २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गांवरील दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यातच आता रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे ही रेल्वेसेवाही विस्कळीत झाली आहे. यामुळे दोन्ही शहरातील रस्ते व रेल्वे सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे.

मुंबई–पुणे रेल्वे मार्गावरील बोगदा क्रमांक ४० येथे दरड कोसळली आहे. ठाकूरवाडी केबिन ते मंकील दरम्यानच्या रेल्वे मार्गावर ही घटना घडली आहे.
दरड हटविण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू असून, मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही गाड्या रद्द तसेच वळविण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची स्थिती तपासूनच प्रवास करावा, अशी माहिती पुणे जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

दोन्ही महामार्ग बंद

गेल्या काही तासांत सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग तसेच जुना मुंबई–पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवर
दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे दोन्ही महामार्गावरील वाहतूक गंभीरपणे प्रभावित झाली आहे. त्यामुळे पुणे–मुंबई तसेच मुंबई–पुणे या दोन्ही दिशेची वाहतूक पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे–मुंबई किंवा मुंबई–पुणे असा प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास कृपया प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्ययावत माहितीनुसारच प्रवास करावा. नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खालील आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवावेत.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष

  • लँडलाईन : ०२०-२६१२३३७१
  • टोल फ्री हेल्पलाईन : १०७७
  • मोबाईल : ९३७०९ ६००६१

पुणे महानगरपालिका

  • ०२०-२५५०१२५९
  • ०२०-२५५०६८००

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

  • ०२०-६७३३११११

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण– पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद दल

  • ९५४५२ ८२९३०

नागरिकांना आवाहन :
पूर, दरड कोसळणे, रस्ता बंद होणे किंवा इतर कोणत्याही आपत्तीजन्य परिस्थितीत तात्काळ संबंधित यंत्रणेशी वरील क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.