पुणे : मुंबई आणि पुणे परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक ठप्प झाली. याचा फटका लाखो आयटी कर्मचाऱ्यांना बसला. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम देण्याची मागणी आयटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या मागणीला पाठिंबा दर्शविला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे. यामुळे मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-पुण्यासह अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरांमध्ये अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूकीची कोंडी होत असून यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

माझी शासनाला विनंती आहे की, पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसह पावसाचा तडाखा बसलेल्या ठिकाणी ज्या आस्थापनांमध्ये शक्य आहे तेथे ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या मुभा कर्मचाऱ्यांना द्यावी. माझे नागरिकांना आवाहन आहे की, कृपया आपण काळजी घ्यावी. विशेषतः नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कारणाशिवाय घराबाहेर पडू नये.

कंपनीवर सक्ती करा

हिंजवडी आयटी पार्कसह वाकड, पुनावळे आणि ताथवडे परिसरात वाहतूक कोंडीमुळे लाखो आयटी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज’ या संघटनेचे अध्यक्ष पवनजीत माने म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली होती. अतिवृष्टीचा अंदाज असल्याने हे पाऊल उचलण्यात आले होते.

मुसळधार पावसामुळे आज आयटी पार्कसह वाकड परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अशा परिस्थितीत आयटी कर्मचारी घरून काम करू शकतात. त्यातून वाहतुकीवरील ताण कमी होण्यासोबत आयटी कर्मचारीही कोंडीत अडकणार नाहीत. यापुढे पावसाळ्यात शाळांना सुटी जाहीर करताना जिल्हाधिकाऱ्यांनी आयटी कंपन्यांवर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याची सक्ती करावी. कंपन्यांवर सक्ती न केल्यास त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जाते. त्यामुळे या दृष्टीने पाऊल उचलावे.

रस्ते जलमय अन् वाहतूक कोंडी

मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाकड परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचले. यामुळे वाहतूक महामार्गासह सेवा रस्त्यांवर कोंडी झाली. याचबरोबर भूमकर चौकातील भुयारी मार्गात पाणी साचून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे या परिसरातून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारे कर्मचारी कोंडीत अडकून पडले. याचबरोबर आयटी पार्कमध्येही अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले. आयटी पार्कमधील तिसऱ्या टप्प्यात भोईरवाडी परिसरात पावसाच्या पाण्याचा मोठा प्रवाह निर्माण झाल्याने परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली.