Raj Thackeray On Mumbra Thane Train Accident : रेल्वेमध्ये होणाऱ्या अपघातांना मुंबईत परप्रांतीयांचे येणारे लोंढे कारणीभूत असून, रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ‘मंत्री परदेश दौरे करून तेथे काय पाहतात, हे त्यांनाच माहीत. तेथील रेल्वे आणू नका; पण त्यांच्याकडे अपघात का होत नाहीत, हा विचार तरी आणा’ अशी टीका त्यांनी केली.
राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असून, मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातावरून त्यांनी रेल्वे मंत्रालय आणि प्रशासनावर पत्रकारांशी बोलताना टीका केली. ठाकरे म्हणाले, ‘मुंबईत दररोज परप्रांतीयांचे येणारे लोंढे या व्यवस्थेला कारणीभूत आहेत. रेल्वेचा बोजवारा उडाला आहे. मुंबईत लोकलमध्ये लोक येतात कुठून आणि जातात कुठे, काहीही कळत नाही. रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची रेल्वे मंत्रालयाला सूचना केली होती. त्याचे काय झाले, हे कोणालाही माहिती नाही. मेट्रो, उड्डाणपूल बांधले जात आहेत. पुनर्विकासाच्या नावाखाली उंच इमारती बांधण्यात येत आहेत. मात्र, वाहनतळांची व्यवस्था नाही. मेट्रो, उड्डाणपूल करूनही खासगी वाहनांच्या नोंदी थांबलेल्या नाहीत.’
‘मंत्री परदेश दौरे करतात. तेथे जाऊन काय पाहतात हे त्यांनाच माहिती. तेथील रेल्वे आपल्याकडे आणू नका; पण ते रेल्वे चालवतात कशी, त्यांच्याकडे अपघात का होत नाहीत, या मागचा विचार आपल्याकडे घेऊन या. मात्र, त्यासाठी काहीही होत नाही, असे ठाकरे म्हणाले.‘मुंबईत अपघात झाला नाही, असा एकही दिवस जात नाही. मुंबईची लोकल कशी चालते, हे आश्चर्य आहे.
अपघात झाला की, रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागितला जातो. राजीनामा देण्याऐवजी तेथे जाऊन काय झाले, ते पाहून सुधारण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे. मात्र, तसे होत नाही, अशी टीका ठाकरे यांनी केली.
‘राज-उद्धव एकत्र येण्याकडे अधिक लक्ष’
‘मी वारंवार शहराच्या दुरवस्थेविषयी बोलतो. मात्र, त्याला महत्त्व दिले जात नाही. त्यापेक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या बातम्यांना अधिक वेळ दिला जातो,’ अशी नाराजी राज ठाकरे यांनी व्यक्त केली.