पुणे : मुंढव्यातील केशवनगर परिसरात मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाचा खून झाला नसल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी मुंडवा परिसरातील ७० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा तरुणाचा मृत्यू डंपरच्या धडकेत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

तिपन्ना पत्याप्पा राठोड (वय ४१ ,रा. मोमीननगर, मांजरी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मांजरी-केशवनगर रस्त्यावर मोकळ्या जागेत तरुणाचा मृतदेह सापडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. तरुणाची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. प्राथमिक तपास, तसेच घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला खुनाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.

सीसीटीव्ही चित्रीकरणावरुन पोलिसांनी मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाची ओळख पटविली. मृतदेह तिपण्णा राठोड याचा असल्याचे उघड झाले. चौकशीत राठोड याला दारू पिण्याचे व्यसन असल्याची माहिती मिळाली. १५ मे रोजी मध्यरात्री राठोड हा मुंढवा-केशवनगर रस्त्याच्या कडेला झोपला होता. त्या वेळी भरधाव डंपरने त्याला धडक दिल्याचे चित्रीकरणात दिसून आले. अपघातानंतर राडारोडा टाकण्यासाठी आलेला डंपरचालक पसार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन डंपरचालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, गुन्हे शाखेचे निरीक्षक सागर गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश पिंगुवाले, संजय माळी, कल्पना सुरवसे, उपनिरीक्षक युवराज पोमण, पोलीस कर्मचारी कविराज पाटील, रोहिदास उगले, राहुल माेरे, शिवाजी धांडे, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, विशाल बनकर, रुपेश तोडेकर, सचिन बोराटे, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर यांनी ही कारवाई केली.