पुणे : ‘ग्रामीण भागातील सिंचनासाठी पाणी देण्यासाठी उभारण्यात आलेल्या मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून गेल्या तीन आठवड्यांत प्रक्रिया केलेले केवळ दीड कोटी लिटर पाणी जलसंपदा विभागाने घेतले आहे. प्रक्रिया केलेले हे पाणी पूर्ण क्षमतेने घेण्याऐवजी रब्बी हंगामासाठी कालव्यातून आवर्तन सोडण्यात येत असून, पुणेकरांनाही आठवड्यातून एक दिवस पाणीकपातील सामोरे जावे लागत आहे,’ अशी खंत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पात गतवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्यामुळे शहरातील पाणीसाठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. मात्र, दुष्काळामुळे रब्बी हंगामासाठी कालव्यातून गेल्या २५ सप्टेंबरपासून पाणी देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर विवेक वेलणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये जलसंपदा विभागाकडून मुंढवा जॅकवेल प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणी घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
वेलणकर म्हणाले, ‘पुणेकरांच्या करांचे शंभर कोटी रुपये खर्च करून मुंढवा जॅकवेल प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. मात्र, शेतीयोग्य शुद्ध केलेले पाच टक्के एवढे पाणीही जलसंपदा विभागाकडून घेतले जात नाही. शहरात तयार होणाऱ्या सांडपाण्यापैकी दररोज ६५ कोटी लिटर ( ६५० एमएलडी) सांडपाणी महापालिका शेतीयोग्य शुद्धीकरण करून बेबी कॅनालमधून दौंडपर्यंत शेतीसाठी सोडते. मात्र, २५ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या तीन आठवड्यांमध्ये दररोज ६५ कोटी लिटर ( ६५० एमएलडी) ऐवजी सरासरी रोज फक्त दीड कोटी लिटर (१.५ एमएलडी) शुद्धीकरण केलेले सांडपाणी जलसंपदा विभाग उचलून पुढे शेतीसाठी सोडतो आहे.
उपलब्ध सहा पंपांमधून चोवीस तास पाणी सोडण्याऐवजी फक्त एक पंप केवळ साडेचार तास चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, याच काळात खडकवासला धरणसाखळीतून शेतीसाठी पिण्याचे पाणी आवर्तन म्हणून सोडले जात आहे. जर या मुंढवा जॅकवेलमधून शुद्धीकरण केलेले सांडपाणी शेतीसाठी गेले तीन आठवडे पूर्ण क्षमतेने उचलले असते, तर आज धरणातील किमान एक टीएमसी पाणी शेतीसाठी सोडावे लागले नसते.’
धरणातून सोडण्यात आलेले पाणी शहराच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवू शकले असते, ही बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. त्यामुळे ‘जलसंपदा विभागाला मुंढवा जॅकवेलमधून शुद्ध केलेले ६५ कोटी लिटर पाणी शेतीसाठी दररोज उचलण्याचे आदेश काढावेत जेणेकरून शेतीसाठी पिण्याच्या पाण्याची गरज कमी होऊन पुण्याची पाणीकपातही कमी करता येऊ शकेल,’ अशी मागणी वेलणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
