नागरिकांना वेठीला धरल्यास आम्ही समांतर बाजार सुरू करू

शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांना विकण्यासाठी महापालिका आणि अन्य स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घ्यावा,

राजू शेट्टी

खासदार राजू शेट्टी यांचा इशारा
शेतकऱ्यांना त्यांचा माल थेट ग्राहकांना विकण्यासाठी महापालिका आणि अन्य स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केले असून विनियमनाच्या मुद्यावर बंद पुकारून भाजीपाला आडत्यांनी नागरिकांना वेठीला धरण्याचा प्रयत्न केला, तर पुण्यासह अन्य शहरांमध्ये आम्ही समांतर बाजार सुरू करू आणि ग्राहकांना सेवा देऊ, असा इशाराही त्यांनी शनिवारी येथे बोलताना दिला.
फळे व भाजीपाला विनियमनाच्या धोरणास विरोध करून आडत्यांनी येत्या काही दिवसांत बाजारपेठा बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्या पाश्र्वभूमीवर शेट्टी यांनी आडत्यांना थेट आव्हान दिले आहे. ज्या घटकांना हा व्यवसाय अडचणीचा वाटत असेल, त्यांनी सरळ त्यातून बाजूला व्हावे. भाजीपाला हा जीवनावश्यक घटक आहे. त्यामुळे त्याचा पुरवठा बंद करून नागरिकांना वेठीला धरण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. तसे केल्यास आमच्या पुढाकाराने शेतकरी शहरात माल घेऊन येतील आणि थेट ग्राहकांना सेवा देतील, असे शेट्टी म्हणाले.
नागरिकांची गरसोय टाळण्याच्या आमच्या प्रयत्नांना महापालिकेनेही साथ द्यावी आणि या शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करून द्यावी. तसेच अन्य स्वयंसेवी संस्था-संघटनांनीही असे उपक्रम हाती घेऊन नागरिकांना मदत करावी, असे आवाहन शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना केले. पुण्यात याबाबत अन्य संस्थांशीही संपर्क सुरू असून नागरिकांची अडवणूक रोखण्यासाठी शेतकरी पुढाकार घेतील, असे ते म्हणाले. गेली अनेक वष्रे आडते कमी भाव देऊन शेतकऱ्यांना नाडत आहेत आणि अधिक भाव घेऊन ग्राहकांनाही लुटत आहेत. त्यामुळे फळे व भाजीपाला विनियमनासंदर्भात नियुक्त केलेल्या समितीने दिलेला अहवाल स्वीकारण्याचे धाडस सरकारने दाखविले पाहिजे, अशीही मागणी शेट्टी यांनी केली. राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आधीच पिचलेला आहे. तसेच त्याच्या शेतीमालास पुरेसा दर नसल्यामुळे त्यांची स्थिती हलाखीची झाली आहे. अशा काळात आडत्यांच्या विरोधामुळे बाजारपेठा बंद झाल्या, तर उरला सुरला शेतीमालही पडून राहील आणि शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होईल, याची जाणीव सरकारने ठेवावी, असे शेट्टी यांनी सांगितले. आडते मंडळी बंदच्या काळात दादागिरी करतात, असा आरोप करून या काळात आम्ही नागरिकांना शेतीमालाचा पुरवठा करताना संघर्ष उद्भवला, तर पोलिसांनीही योग्य पावले उचलली पाहिजेत, असे ते म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Municipal and other ngo should take the initiative for farmers goods sell directly to consumers

ताज्या बातम्या