पुणे : ‘शहरातील जुने वाडे आणि इमारती पाडताना पर्यावरणाची हानी टाळण्याबरोबरच सुरक्षिततेसाठी काय काळजी घ्यावी, याची नियमावली महापालिकेने तयार केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी १५ क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

या नियमावलीचे पालन करुनच जुने बांधकाम पाडावे लागणार आहे. तसेच, त्यानंतर संबधित कार्यकारी अभियंता यांचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) संबंधित व्यक्तींना घ्यावे लागणार आहे. यामुळे दमदाटी करत काम मिळविणाऱ्यांना चाप बसणार आहे.

पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमध्ये असलेले जुने वाडे तसेच उपनगरांमध्ये असलेल्या जुन्या इमारती पाडून तेथे टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. हे वाडे आणि इमारती पाडण्यासाठी स्वतंत्र नियमावली महापालिकेने तयार केली नव्हती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी काही महिन्यांपूर्वी भेट घेतली होती.

जुने बांधकाम पाडताना आवश्यक नियमावली करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार ही नियमावली तयार करण्यात आली होती. मात्र, त्याच्या अंमलबजावणीचे आदेश काढण्यात आले नव्हते. आयुक्त नवल किशोर राम यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.

जुनी इमारत पाडताना धूळ उडून पर्यावरणाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारणे, स्प्रिंकलर यंत्रणा कार्यान्वित करण्याबरोबरच पोलीस स्थानक, अग्निशमन दलासह आजूबाजूच्या सोसायट्यांना लेखी स्वरुपात माहिती देणे आवश्यक आहे,’ असे नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.

हेमंत संभूस म्हणाले, शहरातील जुन्या इमारती पाडताना सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नव्हती. स्थानिक गुंड तसेच राजकीय दबावाचा वापर करून इमारती पाडण्याची कामे घेतली जात होती. नवीन नियमावलीमुळे चुकीच्या कामांना चाप बसणार असून, नियमांचे पालन करून काम करावे लागणार आहे. या नियमावलीची अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

ही आहे नियमावली….

– पाडकाम करताना २५ फूट उंचीचे पत्रे लावावेत.

– धूळ उडू नये यासाठी पाणी मारणे, स्प्रिंकलर सिस्टिम बसवावेत.

– शेजारील इमारतीला धोका पोचणार असल्यास ती इमारत रिकामी करावी

– पाडकाम करताना पूर्णवेळ सुरक्षारक्षक नेमावा.

– काम सुरू करण्यापूर्वी शेजारच्या सोसायट्या पोलिस व अग्निशामक दलाला लेखी माहिती द्यावी.

– पर्यावरणाला धोका पोहोचू नये, याची काळजी घ्यावी.

– साहित्य वाहतूक करताना त्यावर हिरव्या रंगाचे कापड टाकावे.

– पाडकामाचे फोटो महापालिकेकडे सादर करावेत.

– तांत्रिकदृष्ट्या योग्य व सुरक्षेच्यादृष्टीने पाडकाम पूर्ण झाल्याचा दाखला स्ट्रक्चरल इंजिनियरने सादर करावा.