scorecardresearch

महापालिकेची धडक कारवाई; चार लाख तीन हजार चौरसफूट बांधकाम जमीनदोस्त; स्व. राजा मंत्री पथावरील अतिक्रमणांवर कारवाई

राजाराम पूल ते म्हात्रे पूल या दरम्यानच्या स्व. राजा मंत्री पथावरील (डीपी रस्ता) हरित पट्टा आणि निळी पूररेषा यांमधील अतिक्रमणांवर महापालिकेकडून बुधवारी धडक कारवाई करण्यात आली.

राजाराम पूल ते म्हात्रे पूल या दरम्यानच्या स्व. राजा मंत्री पथावरील (डीपी रस्ता) हरित पट्टा आणि निळी पूररेषा यांमधील अतिक्रमणांवर महापालिकेकडून बुधवारी धडक कारवाई करण्यात आली.

पुणे : राजाराम पूल ते म्हात्रे पूल या दरम्यानच्या स्व. राजा मंत्री पथावरील (डीपी रस्ता) हरित पट्टा आणि निळी पूररेषा यांमधील अतिक्रमणांवर महापालिकेकडून बुधवारी धडक कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये मोठी उपाहारगृहे, व्यावसायिक संकुले, मंगल कार्यालये आणि लहान-मोठय़ा दुकानांचा समावेश आहे. बुधवारी सकाळी अतिक्रमण कारवाई सुरू केल्यानंतर या भागात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

      शहरातील अनधिकृत, विनापरवाना व्यवसायांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळी लवकर कारवाईला सुरूवात करण्यात आली. कारवाईला विरोध होण्याच्या शक्यतेने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. राजाराम पूल ते म्हात्रे पूल या दरम्यानची अनेक मोठी उपाहारगृहे, मंगल कार्यालये ही नदीपात्रालगत असून ती निळय़ा पूररेषेमध्ये असल्याच्या तक्रारी सातत्याने महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या. पर्यावरणप्रेमी आणि अनेक संस्थांनी त्याबाबत राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडेही तक्रार केली होती.

     दरम्यान, महापालिकेकडून ७६ मिळकतींना नोटीस देण्यात आल्या होत्या. त्यापैकी आठ मिळकतींना न्यायालयाची स्थगिती असल्याने या मिळकती सोडून इतर ६८ मिळकतींवर कारवाई करण्यात आली. त्यानुसार चार लाख तीन हजार चौ. फूट क्षेत्रावर कारवाई करण्यात आली. नदीपात्रालगतचा हरित पट्टा, निळी पूररेषेमधील क्षेत्रात नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम तसेच भराव टाकू नये, असे आवाहन कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांनी केले आहे. यापुढेही कारवाई सुरू राहणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

विविध गटांकडून कारवाई

ही कारवाई महापालिकेचे कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ गटांमार्फत करण्यात आली. प्रत्येक गटात एक उपअभियंता, पाच बांधकाम निरीक्षक, एक सहायक यांचा समावेश होता. कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे, राहुल साळुंके, अजित सर्वे अशा ५० अधिकाऱ्यांचा कारवाईत सहभाग होता. २० जेसीबी, १२ गॅस कटर, आठ ब्रेकर, २०० कामगार, २५ पोलीस, १०० सुरक्षा रक्षक, १५ अतिक्रमण निरीक्षक यांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

डीपी रस्त्यावरील अतिक्रमणांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली होती.

– माधव जगताप, प्रमुख, अतिक्रमण निर्मूलन, पुणे महापालिका

महापालिकेवर प्रशासक येताच कारवाई

महापालिकेच्या बांधकाम विभागाबरोबरच अतिक्रमण निर्मूलन विभागाकडूनही या भागात कारवाई करण्यात आली होती. मात्र मोठय़ा अतिक्रमणांना महापालिका प्रशासनाकडून अभय दिले जात असल्याचा आरोप करण्यात येत होता. आता महापालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती गेल्यानंतर प्रथमच येथील अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. राजाराम पूल ते म्हात्रे पूल या दरम्यान स्व. राजा मंत्री पथालगत (डीपी रस्ता) मुठा नदीच्या कडेला हरित पट्टा आहे. त्यामुळे येथे बांधकामे करता येत नाहीत. मात्र अतिक्रमणांबरोबरच नदीपात्रात मोठय़ा प्रमाणवर राडारोडा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले होते. बांधकाम व्यावसायिक, राजकीय नेत्यांशी संबंधांमुळे अतिक्रमणांवर कारवाई होत नव्हती.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Municipal crackdown feet construction land action encroachments raja mantri path ysh

ताज्या बातम्या