स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांना मोबाइल अ‍ॅपची सक्ती

पुणे : आगामी स्वच्छ सर्वेक्षणासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. सर्वेक्षणातील निकषांची पूर्तता करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू झाल्या असून त्याचा एक भाग म्हणून महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘स्वच्छ’ मोबाइल उपयोजन (अ‍ॅप) कार्यान्वित करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दरवर्षी देशातील शहरांसाठी ‘स्वच्छ शहर’ ही स्पर्धा केंद्र सरकारकडून घेण्यात येते. या स्पर्धेत दरवर्षी महापालिकेकडूनही सहभाग घेतला जातो. मात्र शहर स्वच्छतेबाबतच्या उपाययोजना केवळ स्पर्धेपुरत्याच केल्या जात असल्याचे, यापूर्वी वेळोवेळी स्पष्ट झाले होते. त्यामुळे शहर स्वच्छतेच्या उपाययोजना वर्षभर कायम राहाव्यात, या हेतूने सहभागी शहरांचे मानांकन दर तीन महिन्यांनी जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेला अहवाल द्यावा लागणार असून त्यासाठी काही निकषांची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाची विशेषत: घनकचरा व्यवस्थापन विभागाची धावधाव सुरू झाली आहे. प्रत्यक्ष शहराची पाहणी, नागरिकांचा सहभाग आणि निकषांची पूर्तता असा त्यासाठीचा क्रम निश्चित करण्यात आला आहे.

दरवर्षी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारकडून ही स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेसाठी ऑक्टोबर महिन्यापासून महापालिकेकडून तयारी सुरू होते. यंदाही स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत महापालिकेने सहभाग नोंदविला आहे. स्पर्धात्मक, गुणात्मक आणि प्रभावी कामकाज यावर मानांकन मिळणार असल्यामुळे शहराला अव्वल करण्यासाठी महापालिकेचा खटाटोप सुरू झाला आहे.  त्यातून नागरिकांनी भ्रमणध्वनीमध्ये केंद्र सरकारचे अ‍ॅप कार्यान्वित करणे आवश्यक असून त्यानुसार महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना अ‍ॅप कार्यान्वित करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे महापालिकेतील सर्व विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अ‍ॅप कार्यान्वित केल्याची एकत्र माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाला द्यावी, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सर्वेक्षणाची धावपळ लक्षात घेऊन स्वच्छ  पुरस्कार, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंदी, सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई असे उपक्रमही याअंतर्गत महापालिकेने हाती घेण्याचे नियोजित आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर, घाण आणि लघुशंका करणाऱ्यांवर जागेवरच दंड आकारण्याच्या कारवाईचा धडाकाही प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. यंदा जाहीर झालेल्या शहर स्वच्छतेमध्ये पुणे देशपातळीवर पाचव्या क्रमांकावर होते. आगामी सर्वेक्षणात पहिला क्रमांक प्राप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे सर्वेक्षणातील निकषांची पूर्तता करण्यासाठी महापालिने केलेले चकाचक सादरीकरण आणि उपाययोजनांचा देखावाही महापालिकेकडून होण्याची शक्यता आहे. 

नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेचा पाठपुरावा सुरू आहे. अ‍ॅप कार्यान्वित केल्यानंतर त्यावर परिसरातील समस्या निदर्शनास आणल्यास त्यावर तातडीने कार्यवाही होणार आहे. महापालिकेसाठी हे उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी काही गुणांकन आणि मानांकनही आहे. शहर स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना प्रस्तावित आहेत.

– ज्ञानेश्वर मोळक, अतिरिक्त आयुक्त, महापालिका