पुणे : पाणीबचतीचा सल्ला देणाऱ्या महापालिकेची अवस्था मात्र दिव्याखाली अंधार अशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिका मुख्य इमारतीमधील स्वच्छतागृहातून अव्याहतपणे पाणी वाहत असून स्वच्छतागृहांमधील पाणीगळती थांबविण्यासाठी महापालिकेकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे चित्र आहे. त्याबाबत स्वयसेवी संस्थांनी नाराजी व्यक्त केली असून महापालिका आयुक्, प्रशाकस विक्रम कुमार यांच्याकडे तक्रार केली आहे. सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी हा प्रकार आयुक्तांच्या निवेदनाद्वारे आयुक्तांच्या निदर्शनास आणला आहे.

शहरातील सर्व भागाला समन्यायी पद्धतीने समान पाणीपुरवठ्याचे गाजर महापालिका दाखवित आहे. पावसाने ओढ दिल्याने सध्या चोवीस तासातून एकदाच पाणीपुरवठा महापालिकेकडून सुरू आहे. धरणात पाणीसाठा कमी असल्याने पाण्याची बचत करावी, असा सल्ला महापालिका प्रशासनाकडू नागरिकांना दिला जात आहे. मात्र महापालिकेच्या मुख्य भवनातील स्वच्छतागृहातून पाण्याची होणारी अव्याहत गळती महापालिकेला रोखता आलेली नाही.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि त्यांची सहकारी रुपाली यांनी महापालिका मुख्य भवनातील पुरूषांच्या आणि महिलांच्या स्वच्छतागृहाची पाहणी केली. त्यावेळी गळती होत असल्याचे पुढे आले. त्याबाबतची माहिती वेलणकर यांनी दिली. पुरुषांच्या स्वच्छता गृहांमधील ८० टक्के युरीनल्समध्ये अव्याहत पाणी वाहत आहे.. सगळ्यात खेदाची बाब म्हणजे आपल्या चौथ्या मजल्यावरील कार्यालयाशेजारच्या स्वच्छतागृहातील सर्व युरीनल्समध्ये अव्याहत झरे वाहत आहेत. स्त्रियांच्या स्वच्छतागृहांमध्ये गळती विशेष आढळली नाही. मात्र स्त्रियांच्या स्वच्छतागृहाची संख्या पुरुषांच्या स्वच्छतागृहापेक्षा कमीच असल्याचे वेलणकर यांनी सांगितले.

वार्षिक आठ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असणाऱ्या महापालिकेला स्वतः च्या मुख्यालयातील स्वच्छतागृहांमधील पाणीगळती थांबवण्यासाठी दुरुस्तीसाठी पैसे नाहीत की इच्छाशक्ती नाही, अशी विचारणा वेलणकर यांनी आयुक्त, प्रशासक विक्र्म कुमार यांच्याकडे केली आहे.