पुणे: ‘काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच आपले आवडते मुख्यमंत्री होते,’ असे वक्तव्य केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी केले.
‘जय वैभवलक्ष्मी फाउंडेशन’च्या वतीने आयोजित विशेष सोहळ्यात माजी आमदार दिलीप देशमुख यांना मोहोळ यांच्या हस्ते ‘सहकार भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. उपस्थितांशी संवाद साधताना मुरलीधर मोहोळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘मी जेव्हा महाविद्यालयात शिक्षण घेत होतो आणि भाजप युवा मोर्चाचे काम करत होतो. तेव्हा आमच्यासारख्या तरुणांसाठी महाराष्ट्राचा लोकप्रिय चेहरा विलासराव देशमुख हेच होते,’ असे मोहोळ म्हणाले.
विलासराव देशमुख आणि भाजपचे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यातील दिलखुलास मैत्रीचा दाखला देत मोहोळ म्हणाले, ‘मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून घडलो. मुंडे साहेब आणि विलासराव यांच्यातील मैत्रीमुळे आमच्या मनात विलासरावांबद्दल नेहमीच एक भावनिक धागा राहिला. मुंडे साहेबांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात या दोघांचे झालेले तुफान भाषण मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. राजकारण कोणत्या मर्यादेपर्यंत असावे आणि कुठे नसावे, याची खरी दिशा आम्हा कार्यकर्त्यांना त्या भाषणातूनच मिळाली.’
‘मी मनापासून बोललोय!’
मोहोळ म्हणाले, ‘वेगळ्या विचारसरणीत काम करणारा युवक कार्यकर्ता म्हणून मला वाटते, की या देशातील सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांपैकी एक विलासराव होते. देवेंद्रजी यांच्याबरोबरच मला मनापासून आवडणारे दुसरा मुख्यमंत्री म्हणजे विलासराव देशमुख साहेब!’ ‘माझ्या विधानाची बातमी होईल, याची कल्पना असूनही मी हे बोलतोय,’ असे त्यांनी स्पष्ट केले. ‘मी हे केवळ आज कार्यक्रमाला आलो म्हणून सांगत नाही. माझे जेवढे मित्र आहेत, त्यांना तुम्ही विचारू शकता. मी हे मनापासून बोलतोय,’ असे ते म्हणाले.
